लैंगिक संबंधांच्या माध्यमातून होणाऱ्या आजारांपासून बचाव व्हावा आणि गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांसारखे पर्याय वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात; मात्र आजकालची तरुण पिढी या गोष्टी गांभीर्याने घेत नसल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एक सर्वेक्षण केलं असून, त्याचा अहवाल आता समोर आला आहे. युरोपीय देशांमधल्या किशोरवयीन मुलांमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर कमी होत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, सर्व्हेतल्या सुमारे एक तृतीयांश मुला-मुलींनी कबूल केलं, की शेवटच्या वेळी सेक्स केला तेव्हा त्यांनी कंडोम किंवा गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला नव्हता. 2018 पासून या ट्रेंडमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अशा प्रकारच्या असुरक्षित सेक्समुळे लैंगिक आजार, लोकसंख्या वाढणं आणि एड्सचा धोका वाढला आहे.
डब्ल्यूएचओने युरोप आणि मध्य आशियातील 42 देशांमध्ये सर्वेक्षण केलं होतं. या देशांतल्या 15 वर्षं वयोगटातल्या दोन लाख 42 हजार मुला-मुलींचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून असं निदर्शनास आलं, की शेवटच्या वेळी सेक्स करताना कंडोम वापरणाऱ्या मुलांची संख्या 2022 मध्ये 61 टक्क्यांवर आली आहे. 2014 मध्ये हे प्रमाण 70 टक्के होतं. सेक्स करताना कंडोम आणि सेक्सनंतर गर्भनिरोधक गोळ्या वापर करणाऱ्या मुलींची संख्या 63 (2014) टक्क्यांवरून 56 (2022) टक्क्यांवर आली आहे. सुमारे एक तृतीयांश किशोरवयीन मुलं सेक्स करताना कंडोम वापरत नाहीत.
सर्वेक्षणानुसार, 2014 ते 2022 या कालावधीत गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर तुलनेने स्थिर राहिला. 15 वर्षं वयोगटातल्या 26 टक्के मुलींनी शेवटच्या वेळी सेक्स केल्यानंतर या गोळ्या वापरल्या होत्या. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या 33 टक्के किशोरवयीन मुलांनी कंडोम किंवा गोळ्या वापरल्या नव्हत्या, तर उच्चवर्गीय कुटुंबातल्या किशोरवयीन मुलांपैकी 25 टक्के मुलांनी या साधनांचा वापर केला नव्हता.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे युरोप डायरेक्टर हॅन्स क्लुग (Hans Kluge) म्हणाले, की युरोपातल्या अनेक देशांमध्ये अजूनही लैंगिक शिक्षण दिलं जात नाही. जर तरुणांना असुरक्षित सेक्सच्या दुष्परिणामांबद्दल योग्य वेळी माहिती दिली नाही तर लैंगिक रोग आणि लोकसंख्या वाढण्याचा धोका आहे.