ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘आंदोलन कसे करावे’, पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना टोला


मनोज जरांगे पाटील यांचं अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे हे सगेसोयरेच्या मागणीसाठी ठाम आहेत. त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत राज्य सरकारला दिली आहे.

सरकारने 13 जुलैपर्यंत सगेसोयरेबाबतचा निर्णय घेतला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत आपण मराठा समाजाचे उमेदवार उभे करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मनोज जरांगे यांच्या या मागणीनंतर ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी आहे. मनोज जरांगे यांची मागणी मान्य केली तर ओबीसी आरक्षणावर मोठा परिणाम होईल, अशी भीती ओबीसी नेत्यांना आहे. त्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं जालन्याच्या वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या आरक्षणाचं कौतुक भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा यांनी यांनी ट्विट करत लक्ष्मण हाके यांची पाट थोपटली आहे. तर पंकजा यांनी या माध्यमातून मनोज जरांगे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावल्याची चर्चा आहे.

 

“आंदोलन कसे करावे, सालस, अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटनेबद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर वडी गोदरीमध्ये पहा…वाह रे वाह..”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. या भेटीनंतर देखील पंकजा मुंडे यांनी ट्विट करत भूमिका मांडली होती.

“राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

राज्य सरकारची ओबीसी नेत्यांसोबत बैठक

 

दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 10 ओबीसी नेत्यांसोबत राज्य सरकारची बैठक सुरु आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत सरकार या ओबीसी नेत्यांना काय आश्वासन देतं? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्यात आता वाकयुद्ध रंगल्याचं बघायला मिळत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *