ताज्या बातम्या

सेल्फी काढताना किल्ल्यातील बुरुजावरून तोल गेला; १०० फुटांवरून कोसळून नवविवाहितेचा मृत्यू


तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तूळ) येथील एक नवविवाहिता नळदुर्गच्या किल्ल्यातील बुरुजावर सेल्फी घेत असताना सुटलेल्या वाऱ्यात तोल जाऊन सुमारे शंभर फुटावरून खाली कोसळली.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली आहे.

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तूळ) येथील अमीर महेबूब शेख यांच्याशी तुळजापूर तालुक्यातील राकेल या गावातील त्यांच्या मामाची मुलगी निलोफर (२२) हिचा २० मे रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर हे नवदाम्पत्य सोबतीला भाचा इरफान कासीम शेख, मित्र सचिन भगवान सिरसाठ हे नळदुर्ग येथील किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. दरम्यान, सकाळी अकरा वाजता किल्ल्यातील उपल्या बुरूजावर हे सर्वजण फोटोसेशन करीत होते. निलोफर याही फोटो काढून घेत होत्या. बुरुजावरील वायव्य टोकाला थांबून त्या फोटो घेत असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटला. यामुळे निलोफर यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या निलोफर यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता मयत झाल्याचे स्पष्ट झाले.

लग्नाच्या आठव्याच दिवशी गाठले मृत्यूने…
मयत निलोफर यांचे २० मे रोजी लग्न झाले होते. विवाहाला आठही दिवस पूर्ण झाले नाही तोच मृत्यूने त्यांना गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या बुरुजावरून त्या खाली पडल्या, तो उपल्या बुरुज सुमारे १०० फूट उंचीचा आहे. वर जाण्यासाठी ७७ पायऱ्या चढाव्या लागतात. अकस्मात आलेल्या वाऱ्याने निलोफरचा घात झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *