ताज्या बातम्याशिक्षण

शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! प्रत्येक शनिवारी आता इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची दप्तराविना शाळा


इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ओझे वाटू नये, शाळेविषयी गोडी कायम राहावी, त्यांची आवड जोपासली जावी या हेतूने आता आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा भरणार आहेत.

या उपक्रमाची अंमलबजावणी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासूनच होणार असून शालेय शिक्षण विभागाने त्यासंबंधीचा आदेश सर्वच शिक्षणाधिकाऱ्यांसाठी काढला आहे.

शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण वाढणार नाही, याची खबरदारी घेत आता त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याला प्राधान्य दिले जात आहे. या अनुषंगाने आता सकाळच्या सत्रात (सकाळी साडेसात वाजता) भरणाऱ्या शाळा सकाळी नऊ वाजता भरणार आहेत. दुसरीकडे आठवड्यातील पाच दिवस (सोमवार ते शुक्रवारपर्यंत) विद्यार्थ्यांना पुस्तकी धडे दिले जाणार आहेत. रविवारी तर सुटी असणार आहे, पण आता प्रत्येक आठवड्यातील शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तराविना शाळेत बोलावले जाणार आहे. त्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांच्या आवडीला प्राधान्य दिले जाणार असून कला, खेळ, ऐतिहासिक किंवा प्रेक्षणीय स्थळांना भेटी, स्काऊट गाइड, कथा सांगणे असे उपक्रम शिक्षकांना घ्यावे लागणार आहेत. आठवड्यातील दोन दिवस त्यांना अभ्यासपासून विश्रांती भेटल्यानंतर ते सोमवारी शाळेत येतील आणि त्यांच्यातील अभ्यास व शाळेबद्दल गोडी वाढलेली असेल, असा विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामागे आहे.

पहिली-दुसरीच्या अभ्यासक्रमात २०२५-२६पासून बदल

इयत्ता पहिली व दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत असून त्याचा मसुदा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून तयार झाला आहे. त्यावरील सूचना, हरकती आता मागविण्यात आल्या आहेत. तो मसुदा अंतिम झाल्यानंतर नवीन अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे. नवीन अभ्यासक्रमातून इयत्ता पहिली व दुसरीतील चिमुकल्यांची तार्किक, बौद्धिक, मानसिक क्षमता वाढतील, त्यांना शाळेची व अभ्यासाची गोडी लागेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा

चालू शैक्षणिक वर्षापासून आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा (इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत) भरतील. ‘आनंदी शनिवार’ या संकल्पनेअंतर्गत त्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणे, स्काऊट गाइड, विविध ठिकाणांना भेटी, विद्यार्थ्यांच्या आवडीचे खेळ घ्यायचे आहेत.

– शरद गोसावी, संचालक, शालेय शिक्षण विभाग (प्राथमिक), पुणे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *