जगाने घातले बोट तोंडात, भारताने इतिहास घडवला; Tata ने पाठवली पहिल्या सेमीकंडक्टर चिप्सची खेप परेदशात
कंपनीने मोठा इतिहास रचला आहे. भारतात निर्मिती झालेल्या पहिल्या सेमीकंडक्टर चिप्सची पहिल्यांदा निर्यात झाली आहे. पथदर्शी प्रकल्पाची ही पहिली यशोगाथा भारताने लिहिली आहे.
एका छोट्या प्रमाणात का असेना या पायलट प्रकल्पाला यश आल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. कोरोना काळात चीनमधील उद्योगांना मोठा फटका बसला. चीन आणि तैवानमधून मोठ्या प्रमाणात जगाला सेमीकंडक्टर, चीपचा पुरवठा करण्यात येत होता. कोरोना काळात पुरवठा खंडित झाल्याने अनेक कार आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनावर परिणाम दिसला. त्याचवेळी भारताने सेमीकंडक्टर हब होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. आज त्यात इवलेस पाऊल भारताने टाकले आहे.
या देशांमध्ये केली निर्यात
द इकोनॉमिक टाईम्सने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या बेंगळुरू येथील संशोधन आणि विकास संस्थेत (RND) सेमीकंडक्टर चिप्स तयार करण्यात आली. टाटाने या सेमीकंडक्टरचे पॅकेज परदेशातील सहयोगी संस्थांना पाठवले. यामध्ये जपान, अमेरिका, युरोप आणि अन्य देशांचा समावेश आहे. वाढती मागणी लक्षात घेता कंपनी आता आसाममधीळ मोरीगाव आणि गुजरातमधील ढोलेरा येथे उत्पादन युनिट सुरु करत आहे. गुजरातमध्ये तर 10 लाख डॉलर चिप निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
नॅनोमीटरमधील चिप्सचं उत्पादन
टाटा इलेक्ट्रॉनिक्सने आता पुढील उद्दिष्ट्य पण समोर ठेवले आहे. त्यानुसार, कंपनी 28 ते 65 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिप्सची निर्मिती करणार आहे. त्यापेक्षा अधिक उच्च दर्जाच्या चिप्स निर्मितीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. सध्या निर्मिती करण्यात आलेली चिप्स ही बहुउपयोगी आहे. ती खास एका वापरासाठी तयार करण्यात आलेली नाही.
Tesla ची Tata सोबत हातमिळवणी
सेमीकंडक्टर उत्पादनात जागतिक स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी टाटा समूहाने एलॉन मस्क याची वाहन निर्मिती कंपनी टेस्लासोबत करार केला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत टाटा कंपनीला मांड ठोकता येणार आहे. सेमीकंडक्टरच्या साखळी उत्पादनात त्यामुळे गतिमानता येऊन चीनाल धोबीपछाड मिळू शकते. भारतात काही कंपन्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीजमध्ये नशीब आजमावत आहेत.