ताज्या बातम्या

Video”शरद पवारांकडून राज्यातल्या सर्व सूनांचा अपमान


मुंबई : पुत्रीप्रेमामुळे आपण सुनांचा अपमान करत आहात. आपल्या सारख्या जाणत्या राजकारण्याकडून ही अपेक्षा नव्हती, असा घणाघात शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी शरद पवारांवर केला आहे.

शरद पवार यांनी मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक असतो, असे वक्तव्य केले होते. यावरून आता शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शीतल म्हात्रे म्हणाल्या की, “शरद पवारांकडून राज्यातल्या सर्व सूनांचा अपमान झाला आहे. सावित्री, येसूबाई, ताराराणी यांच्यासारख्या कर्तृत्वनान स्त्रियांचा हा अपमान आहे. पुत्रीप्रेमामुळे आपण सुनांचा अपमान करत आहात. आपल्या सारख्या ‘जाणत्या’ राजकारण्याकडून ही अपेक्षा नक्कीच नाही,” असे त्या म्हणाल्या.

तसेच ज्योती वाघमारे म्हणाल्या की, “पवार साहेब आपणही एका मुलीचे बाप आहात आणि तुमची मुलगी सुळेंच्या घराण्यामध्ये लग्न करुन गेलेली आहे. मग सुप्रीयाताई सुळेंना कुणी बाहेरची म्हटलं तर ते तुम्हाला आवडेल का? तुमची लेक म्हणजे माहेरची आणि दुसऱ्याची लेक म्हणजे बाहेरची असा तुमचा न्याय आहे का? कुठलीही मुलगी जेव्हा उंबऱ्यावरचं माप ओलांडून सासरी येते तेव्हा ती त्या परिवाराच्या सुखासाठी स्वत:च्या सर्व सुखांचं समर्पण करते. अशा सुनांना बाहेरचं म्हणणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं आहे का?” असा सवाल त्यांनी केला.

“औरंगजेबाला याच मातीमध्ये गाडणाऱ्या महाराणी ताराबाईसाहेब या भोसले घराण्याच्या सूनच होत्या. ज्यांचा प्रत्यक्ष संभाजी महाराजांनी स्त्री, सखी राज्ञी जयती असा गौरव केला त्या महाराणी येसूबाई यासुद्धा शिवाजी महाराजांच्या सून नव्हत्या का? तसेच एक नव्हे तर दोन दोन छत्रपती घडवणाऱ्या राजमाता जीजाऊ यासुद्धा भोसले घराण्याच सून म्हणूनच आल्या होत्या. स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई यासुद्धा फुले घराण्याच्या सुनबाईच होत्या. त्यामुळे सुनांना बाहेरची म्हणून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम लेकीबाळींचा अपमान केलेला आहे, हे महाराष्ट्र विसरणार नाही,” असेही त्या म्हणाल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *