अकोला : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवा ट्विस्ट आला आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली. दुसरीकडे प्रकाश आंबडेरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्यानं ते महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याच्या शक्यतांवर शिक्कामोर्तब झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नागपुरात वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. तसेच, राज्यातील सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी माहितीही प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी एकूण 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच, मनोज जरांगे त्यांच्या उमेदवारांबाबत 30 एप्रिलनंतर निर्णय घेतील असंही आंबेडकरांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, “काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार”
“सर्वसामान्य लोकांना परिवर्तन हवं आहे. नवी आघाडी करतांना आमच्यावर टीका होईल. आरोप होतील. शेती, किमान आधारभूत मूल्य, कृषी आधारीत उद्योग हे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जावू. जरांगे पाटलांसोबची नवी मैत्री हे सामाजिक गठबंधन. लोक हे स्वीकारतील. ओबीसींना आतापर्यंत खूप कमी वाटा मिळाला आहे. ओबीसी, भटके-विमुक्तांना अधिकाधिक उमेदवारी देणार. भाजपने मुस्लिमांना वेगळं पाडण्याचे जे राजकारण सुरू केलं त्याला उत्तर म्हणून मुस्लीम उमेदवार देणार. जैनांनाही प्रतिनिधित्व देणार.”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“ही राजकारणातील नवी वाटचाल. या वाटचालीला समूह पाठींबा देईल. राजकारण आणि निवडणुकीत प्रचंड पैशांचा वापर. यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी मतदारांसोबत न राहता डोनेशन देणाऱ्यांसोबत राहते. यामुळे कार्यकर्त्यांनी स्वत:च्या खर्चाने प्रचार करावा. कमीत कमी पैशात उमेदवाराने निवडणूक लढवावी हा प्रयत्न.”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर
भंडारा-गोंदिया : संजय केवट
गडचिरोली : हितेश पांडुरंग मडावी
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंह पवार