राजकारण माझा मार्ग नाही आणि मी त्यात येणार नाही,उमेदवार उभा करण्याचा निर्णय ३० तारखेला घेऊ.
राजकारण माझा मार्ग नाही आणि मी त्यात येणार नाही. निवडणूक हा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याचा विषयही नाही. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय ३० तारखेला घेऊ.
तत्पूर्वी, आपण गावागावांत बैठका घेऊन समाजाचा होकार आणि नकार टक्केवारीत मला कळवावा. उमेदवार देताना इतर जाती- धर्मालाही सोबत घ्यावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
अंतरवाली सराटी येथे रविवारी आयोजित मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. मराठ्यांच्या एकजुटीमुळे ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत; परंतु आता नोंद शोधणे आणि ज्यांनी नोंदीच्या आधारे अर्ज केले ते अर्ज थांबविले आहेत, मनोज जरांगे पाटील म्हणाले.
विधानसभेत गणिते जुळवू
कोण म्हणते सत्ताधारी पाठीशी आहेत. कोण म्हणते विरोधक पाठीशी आहेत. त्यामुळे आपण कोणाचीच बाजू घेणार नाही. आपल्या मागण्या राज्य सरकारकडे आहेत. त्यामुळे विधानसभेत गणिते जुळवू, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. जरांगे यांची ही भूमिका पाहता लोकसभा नव्हे, तर विधानसभेतही राजकीय नेतेमंडळींची विशेषतः सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे.