बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळी शहरात दाखल झाल्या. यानंतर परळीकरांनी पंकजा मुंडेंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत पंकजा मुंडेंचं स्वागत केलं गेलं. यानंतर पंकजा मुंडेंनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं, तिथून त्या निवासस्थानी दाखल झाल्या आणि त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांनी त्यांचं औक्षण करून स्वागत केलं. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची त्यांच्या घरी जाऊन भेटही घेतली.
लोकसभेचं तिकीट कुणी दिलं?
आमच्या भाजपमध्ये एक पद्धत आहे, राज्याची टीम वेगळी आणि केंद्राची टीम वेगळी. केंद्राच्या टीममध्ये स्वत: पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आहेत. ते स्वत: तिकीट फायनल करतात. माझं भाग्य आहे की स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला उमेदवारी जाहीर केली आहे. बीडच्या गोपीनाथ गडाजवळील बंजारा तांड्यावर होळी साजरी करताना पंकजा मुंडे बोलत होत्या.
14 वर्षांनंतर पंकजा धनंजय मुंडेंच्या घरी
पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीडच्या नाथरा येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधीचे दर्शनही घेतलं. बहिण भावातील संघर्षाला पूर्णविराम मिळाल्यानंतर तब्बल 14 वर्षानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या घरी गेल्या. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या आईचे आशिर्वादही घेतले.