ड्रेस कोडबाबतचा शासन निर्णय रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली
अहमदनगर : शिक्षण व्यवस्थेतील अन्यायकारक संच मान्यतेचा शासन निर्णय दुरुस्त करावा, ड्रेस कोडबाबतचा शासन निर्णय रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन मुंबई विभागाचे अध्यक्ष सुहास हिर्लेकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, कोषाध्यक्ष गणेश नाकती यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना दिले असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
बोडखे म्हणाले की, १५ मार्च रोजी विद्यार्थी व शिक्षकांचे प्रमाण निश्चित करणारा संच मान्यतेचा नवा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन
निर्णयानुसार अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत, तसेच विशेष शिक्षकांविषयी तरतुदीवरही शिक्षकांनी आक्षेप घेतलेले आहेत.
शिक्षक परिषदेच्या वतीने जुन्या संच मान्यतेच्या निकषांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आलेली आहेत.
जुन्या संच मान्यतेच्या निकषांमध्ये ही दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, तसेच शिक्षकांना ड्रेस कोड संहिता लावणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा पोहोचवणारी गोष्ट आहे. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा पेहराव सर्वत्रच योग्य पद्धतीने आहे. शिक्षकांच्या पेहरावाच्या तक्रारी आलेल्या नाहीत. त्यामुळे ड्रेस कोडबाबत सक्ती करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.