मनसे महायुतीत येण्याची ‘गॅरंटी’! मराठी मतांचे विभाजन करून त्याचा फायदा उचलण्याची भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची नेहमीच नीती – खा. संजय राऊत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे तसेच त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीचा तपशील उघड झाला नसला तरी राज्यातील महायुतीमध्ये मनसेच्या सहभागावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
महायुतीत सामील होऊन मनसे लोकसभेच्या किती जागा लढविणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मनसे दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या तीनपैकी दोन मतदारसंघांमध्ये निवडणूक लढू इच्छित असल्याचे समजते. शाह-राज यांची बैठक दुपारी साडेबारा वाजता सुरू होऊन अर्ध्या तासात संपली. शाह यांच्या भेटीपूर्वी राज यांची ताज मानसिंह हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर ते शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर राज व अमित ठाकरे लगेच मुंबईला रवाना झाले.
फडणवीस यांच्या पुढाकाराने बैठक? – राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाशी अमित शाह यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी ही थेट-भेट घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे भाजपसोबत गेल्याने आमच्या शिवसेनेवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. मराठी मतांचे विभाजन करून त्याचा फायदा उचलण्याची भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची नेहमीच नीती राहिली आहे. त्याला काही नेते बळी पडत आहेत, पण मतदार बळी पडणार नाहीत.
-खा. संजय राऊत, शिवसेना नेते
एक ते दोन दिवसांत येईल अधिक स्पष्टता
अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात झालेली चर्चा सकारात्मक होती. मनसेला किती जागांची अपेक्षा आहे हे राज यांनी स्पष्ट केले आहे. येत्या एक ते दोन दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना सांगितले. राज यांनी आता २१ मार्चला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली असून या बैठकीनंतर मनसेची पुढची रणनीती आणखी स्पष्ट होणार आहे. दिल्लीवारीनंतर राज ठाकरे मंगळवारी संध्याकाळी मुंबईत परतले. यानंतर त्यांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दक्षिण मुंबईतून तुमची उमेदवारी निश्चित झाली का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राज मला म्हणाले की गडचिरोलीतून लढ तर त्यालाही माझी तयारी आहे. कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही याचा निर्णय पक्षप्रमुख घेत असतात.