अफगाणिस्तानने २४ तासांतच या हल्ल्याचा बदला घेतला,तालिबानी सैन्याने पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्यांवर बॉम्बचा वर्षाव केलाय
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर सोमवारी (ता. १८) हवाई हल्ले करत एअरस्ट्राइक केला. या हल्ल्यात ८ तालिबानी ठार झाले. याशिवाय काही निष्पाप लोकांचा देखील जीव गेला.
दरम्यान, अफगाणिस्तानने २४ तासांतच या हल्ल्याचा बदला घेतला आहे. तालिबानी सैन्याने पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्यांवर बॉम्बचा वर्षाव केलाय. यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे.
तालिबानच्या नेतृत्वाखालील संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील युद्ध आणखीच पेटण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये वाद सुरू आहे. सोमवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले होते.
या हल्ल्यात ८ तालिबानी ठार झाल्याची माहिती पाकिस्तानने दिली होती. दुसरीकडे पाकिस्तानच्या हल्ल्यात निष्पाप लोकांचा जीव गेल्याचं अफगाणिस्तानने म्हटलं होतं. अशातच पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानच्या काही चौक्यांवर बॉम्बफेक केली.
यावेळी पाकिस्तान आणि अफगाण सैन्यात सीमेवर रक्तरंजित चकमकीही झाल्या. दरम्यान, पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत, तर अफगाणिस्तानचे संरक्षण आणि सुरक्षा दल कोणत्याही आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर देण्यास तयार आहे, असा इशारा तालिबानकडून देण्यात आला आहे.
सोमवारी खोस्त आणि पक्तिया प्रांतांवर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान ८ जण ठार झाले, असे टोलो न्यूजने वृत्त दिले आहे. असे हवाई हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या भूभागाचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे तालिबानने म्हटले आहे.