पाटना : शाळेच्या मुख्याध्यापिकेने सरकारी शाळेतच संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतीलच एका खोलीत शिक्षिका पतीसोबत राहते. त्यांचे संसाराचे साहित्यसुद्धा खोलीत ठेवण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे मुख्याध्यापिका पतीसोबत शाळेतच राहत असूनही शिक्षण विभागाने यावर कोणी कारवाई केलेली नाही. बिहारच्या जुमई जिल्ह्यातील खैरा इथल्या एका गावातील शाळेत हा प्रकार समोर आलाय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शाळेच्या एका खोलीत मुख्याध्यापिका शीला हेंब्रम या राहतात. त्यांचा बेड, फ्रीज, कपाट, टीव्ही, टेबल, स्वयंपाकाचे साहित्यसुद्धा तिथे ठेवलं आहे. ज्या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदान करायचंय तिथेच शिक्षिकेनं संसार थाटला आहे. इतकंच नाही तर शाळेशेजारी सुरू असलेल्या त्यांच्या घराच्या बांधकमाचं साहित्य विद्यार्थ्यांकडूनच इकडे-तिकडे नेण्याचं काम करून घेतलं जात आहे. त्याचेही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
मुख्याध्यापिकेच्या घराचं बांधकाम शाळेशेजारीच सुरू आहे. त्याचे साहित्यसुद्धा शाळेच्या आवारातच ठेवले आहे. याशिवाय शिक्षिकेने त्यांचा संसारही शाळेच्या एका खोलीत थाटला आहे. पतीसोबतच शाळेच्या खोलीत त्या राहतात. पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत १३० विद्यार्थी शिकतात. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षका शाळेतच राहत आहे.
शिक्षिकेनं सांगितलं की, आधी जुमईवरून ये-जा करत होते. पण यायला त्रास होऊ लागला. शेवटी शाळेच्या शेजारी घर बांधायला सुरू केलं. राहण्यासाठी जागा नव्हती म्हणून शाळेच्या कार्यालयात घरचं साहित्य ठेवलं असून तिथेच पतीसोबत राहते. शाळेत मुख्याध्यापिका पतीसोबत राहत असताना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याची माहिती नाही. आता विद्यार्थी आणि पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.