आम्हाला लोकसभेच्या दोन जागा द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, महायुतीतील आणखी एका पक्षाचा जाहीर इशारा
मुंबई : राज्यातील महायुतीत जागा वाटपाचा तिढा (Maharashtra Mahayuti Seat Sharing) कायम असून आज दिल्लीत या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भाजप वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे.
त्यात आता महायुतीचा आणि शिवसेनेचा मित्र पक्ष असलेला पीपल रिपब्लिकन पक्षाने (कवाडे गट – Peoples Republican Party) देखील आम्हाला महायुतीत दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आम्हाला गृहीत धरू नये अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशाराही महायुतीला दिला आहे.
पीपल रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे म्हणाले की, महायुतीत जागावाटप चर्चा सुरू असताना महायुतीचा प्रमुख घटक पक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीला दोन जागा मिळाव्यात अशी राज्यभरातून कार्यकर्त्यांची आणि पक्षाची भूमिका आहे. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली. रामटेक आणि लातूरची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी केली. या चर्चेत सकारात्मक आश्वासन आम्हाला देण्यात आले, पण खऱ्या अर्थानं भीमशक्तीचा सन्मान करायचा असेल तर जागा द्या.
लोकसभेच्या जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही वेगळी भूमिका घेऊ
महायुतीतील अनेक घटक पक्ष आम्हाला येऊन भेटतात, आपण काहीतरी भूमिका घ्यावी असा सूर त्यांच्यात आहे. त्यामुळे महायुतीमध्ये आम्हाला जर दोन जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही आमची वेगळी भूमिका घेऊ. महायुतीने आम्हाला गृहीत धरू नये. परिणाम भोगावं लागेल असं ते म्हणाले.
राज्यभरात एक मोठा जनसमुदाय आणि वर्ग आमच्या सोबत आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेबरोबर आलो, युतीत सहभागी झालो. मित्र पक्षांचा सत्तेत आणि या जागा वाटपामध्ये युतीत सन्मान सन्मान होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जागावाटपाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री दिल्लीला रवाना
राज्यातील जागावाटपाच्या चर्चेचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. शुक्रवारी रात्री दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे चर्चा करणार आहेत. त्यानंतर जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.
महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेला गती आली असून येत्या दोन दिवसात ते जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यामध्ये भाजपकडून जवळपास 32 जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या काही जागांचा समावेश आहे.