आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाचा दणका; दिल्लीतील कार्यालय 15 जूनपर्यंत रिकामे करण्याचे आदेश
कोर्टाने आम आदमी पक्षाला त्यांचे कार्यालय रिकामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी न्यायालयाने १५ जून पर्यंतची वेळ दिली आहे. राऊस ॲव्हेन्यू परिसरातील आपचे कार्यालय कोर्टाच्या जमिनीवर बांधले आहे. नवीन जागेसाठी आप अर्ज करुन शकतो, असं कोर्टाने म्हटलं आहे.
आम आदमी पक्षाने याबाबत सांगितले की, राऊस एव्हेन्यू न्यायालय परिसरात असलेले पक्ष कार्यालय हे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नाही. कारण ही जागा न्यायालय संकुलाच्या विस्तार निश्चित करण्याआधी दिले गेले होते. (Latest Marathi News)
न्यायालयाने म्हटले आहे की, ‘आप’ला दिलेल्या जमिनीवर पक्षाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. येत्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा न्यायव्यवस्थेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने दिल्ली उच्च न्यायालयाला वाटप केलेल्या भूखंडावर असलेले राजकीय कार्यालय रिकामे करण्यासाठी पक्षाला १५ जूनपर्यंत वेळ देण्यात आली आहे.
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पर्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने लँड अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडे पर्यायी जागेसाठी विचारणा करण्याच्या सूचना आम आदमी पक्षाला दिल्या आहेत.
लँड अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला विनंती आहेत की त्यांनी देखील आपच्या अर्जावर तत्काळ विचार करुन चार आठवड्यात निर्णय कळवावा.