शुटिंगवेळी झाली जबरदस्ती अन् अभिनेत्रीनं कायमची घेतली इंडस्ट्रीतून एक्झिट…
सिनेमा इंडस्ट्री म्हणजे खूप मोठी व्याप्ती असलेला उद्योग आहे. त्यात येणारे अनेक कलाकार लोकप्रिय होतात. अनेक जण ती लोकप्रियता कायम राखून कार्यरत राहतात. काही जणांची लोकप्रियता कालांतराने कमी होत जाते, तर काही जण प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सिनेमा क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात.
या क्षेत्रातून अशीच बाहेर पडलेली एक अभिनेत्री म्हणजे अर्चना जोगळेकर. ती सध्या काय करते, कुठे असते, याविषयी अधिक जाणून घेऊ या. ‘डीएनए’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
अर्चना जोगळेकर ही मराठी कुटुंबातली अभिनेत्री असून, ती कुशल कथक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर आहे. आई आशा जोगळेकर यांच्याकडून तिने कथकचे धडे गिरवले. आशा जोगळेकर यांनी 1963 साली अर्चना नृत्यालय नावाने मुंबईत नृत्यप्रशिक्षण देणारी शाळा सुरू केली. कॉलेजमध्ये असताना अर्चना नाटकांमध्ये काम करायची; मात्र अभिनय क्षेत्रात करिअर करायचं तिने ठरवलं नव्हतं.
एकदा वृत्तपत्रात आलेली टॅलेंट हंटची जाहिरात पाहून अर्चनाने त्या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. आई-वडिलांची परवानगी मिळाल्यावर तिने त्यासाठीचा अर्ज भरला. त्यासाठी तिने खूप प्रॅक्टिस केली आणि स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळवलं. परीक्षक पॅनेलने तिला एका शोमध्ये काम करण्याची ऑफर दिली आणि तिने ती तातडीने स्वीकारली. दोन वर्षांत तो शो हिट झाला आणि अर्चनाचं नाव घराघरांत पोहोचलं. तिच्यावर वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून येऊ लागले. त्यामुळे ती निर्माते-दिग्दर्शकांच्या नजरेत आली आणि तिचा फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश झाला.
‘सुना चाधे’ या उडिया भाषेतल्या चित्रपटातून अर्चनाची कारकीर्द सुरू झाली. मर्दानगी, बिल्लू बादशाह, संसार, बात है प्यार की, टेररिस्ट टेरर, आग से खेलेंगे यांसारख्या काही चित्रपटांत ती झळकली. चॅलेंज, कर्मभूमी, किस्सा शांती का, फुलवंती यांसारख्या काही सीरियल्समध्येही ती झळकली.
1997 साली उडिया फिल्मचं शूटिंग करताना एका व्यक्तीने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ती कशीबशी आपली सुटका करून घेण्यात यशस्वी ठरली. तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. दोषी व्यक्तीला 2010 साली 18 महिन्यांच्या कैदेची शिक्षा जाहीर झाली.
या घटनेमुळे अर्चनाचं आयुष्य बदलून गेलं. ती करिअरच्या शिखरावर असताना विवाहबद्ध झाली आणि लग्नानंतर अमेरिकेत स्थलांतरित झाली. 1999 साली तिने अमेरिकेत न्यू जर्सी इथे नृत्यप्रशिक्षण संस्था सुरू केली आणि शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.
आता अर्चना बॉलिवूडपासून दूर आहे; मात्र आजही ती हे क्षेत्र मिस करते. तिने नृत्याला मात्र आयुष्यातून दूर केलेलं नाही. एका मुलाखतीत तिने सांगितलं, की आता ती पतीपासून विभक्त झाली असून, मुलाचा सांभाळ ती एकटीने करते.