घराच्या गॅरेजमध्ये चक्क अण्वस्त्र क्षेपणास्त्र अर्थात न्यूक्लिअर मिसाइल सापडलं, हे घडल कुठ?
अमेरिकेत वॉशिंग्टनमधल्या एका घराच्या गॅरेजमध्ये चक्क अण्वस्त्र क्षेपणास्त्र अर्थात न्यूक्लिअर मिसाइल सापडलं आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे, की एका व्यक्तीला गॅरेजमध्ये न्यूक्लिअर मिसाइल सापडल्यानंतर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली आणि ते मिसाइल म्युझियममध्ये ठेवलं जावं, अशी विनंतीही त्याने केली. याविषयी अधिक माहिती घेऊ या. ‘झी न्यूज’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
वॉशिंग्टनमधल्या बेलेव्ह्यू पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या घरात हे न्यूक्लिअर मिसाइल सापडलं. त्या व्यक्तीला जेव्हा हे मिसाइल सापडलं, तेव्हा त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना धक्काच बसला. त्या व्यक्तीच्या कॉलनंतर थोड्याच वेळात पोलिसांची टीम तिथे गेली. त्यांना गॅरेजमध्ये एक गंजलेलं मिसाइल सापडलं.
पोलिसांनी अशी माहिती दिली, की त्यांना त्या ठिकाणी एक निष्क्रीय झालेलं न्यूक्लिअर मिसाइल सापडलं. बेलेव्ह्यू पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की एअर फोर्स म्युझियमला एक सैन्य ग्रेड रॉकेट दान करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला. ते मिसाइल त्याच्या दिवंगत शेजाऱ्याच्या गॅरेजमध्ये पडलेलं होतं.
दिवंगत शेजाऱ्याच्या संपत्तीची विक्री केली जात असताना या व्यक्तीने ते मिसाइल खरेदी केलं होतं. बेलेव्ह्यू पोलिसांच्या बॉम्ब स्क्वाडने पूर्ण तपासणी केल्यानंतर अशी माहिती दिली, की त्या मिसाइलचं नाव डग्लस एआयआर 2 जिनी असं असून, ते हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र होतं. ते क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेलं होतं. पोलिसांनी अशीही माहिती दिली, की त्याच्या स्फोटाचा कोणताही धोका नव्हता. त्यामुळे पोलिसांनी ते निष्क्रीय मिसाइल तिथेच ठेवलं.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे, की हे पहिलं अण्वस्त्रसज्ज आणि हवेतून हवेत मारा करणारं शस्त्रास्त्र होतं. ते अमेरिकेच्या हवाई दलाने वापरलेलं आतापर्यंतचं सर्वांत शक्तिशाली इंटरसेप्टर मिसाइल असल्याचं म्हटलं जातं. या ग्रेडच्या न्यूक्लिअर मिसाइलचं उत्पादन 1962 साली बंद झालं होतं.