वकील आणि त्याच्या प्रेयसीने खोटी कागदपत्रं, खोटं कुटुंब आणि एक खरा बेवारस मृतदेह यांच्या मदतीने रचला कट,पुढे काय झालं?
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात एक घटना घडली आहे. एक विवाहित वकील आणि त्याच्या प्रेयसीने खोटी कागदपत्रं, खोटं कुटुंब आणि एक खरा बेवारस मृतदेह यांच्या मदतीने एक कट रचला. पुढे काय झालं, हे पितळ कसं उघडं पडलं, याबद्दल अधिक माहिती घेऊ या. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
या घटनेतले वकील महोदय एका मुलीच्या प्रेमात पडले. त्यांना तिच्याशी लग्नही करायचं होतं; पण वकील साहेब मुळातच विवाहित असल्यामुळे या लग्नाला प्रेयसीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. हा विरोध मोडून काढण्यासाठी वकील आणि प्रेयसी यांनी रचलेला कट पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांना एका मृतदेहाची गरज होती. त्यामुळे त्यांनी मृतदेहाचा शोध सुरू केला. हा शोध उत्तर प्रदेशातल्या इटावा शहरात असलेल्या सुंदरपूर रेल्वे फाटकाच्या परिसरात संपला.
रेल्वेला धडकून मृत्यू झालेल्या एका अज्ञात व्यक्तीचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह त्यांना सापडला. मृतदेहाची अवस्था एवढी वाईट होती, की चेहऱ्यावरून मृत व्यक्तीची ओळख पटवणंही शक्य नव्हतं. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी करून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला; पण त्यात यश न आल्यामुळे त्यांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन तो शवागारात ठेवला. असे मृतदेह पोलिसांकडून सहसा 72 तासांपर्यंत शवागारात ठेवले जातात. हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन कोणी आलं, तर मृतदेहाची ओळख पटवून तो नातेवाईकांकडे सुपूर्द केला जातो. अन्यथा पोलिसच अशा बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात.
योगायोग म्हणजे हा मृतदेह शवागारात आणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काही माणसं रुग्णालयात आली आणि त्यांनी या मृतदेहावर दावा सांगितला. अतुल कुमार नामक व्यक्तीचं आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रंही त्या माणसांकडे होती. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. यानंतर मृताचे खरे कुटुंबीय मृतदेहावर दावा सांगण्यासाठी आले तेव्हा या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. हे कुटुंब उत्तर प्रदेशातल्या ओरैय्या इथलं रहिवासी असून मृत व्यक्ती ही 40 वर्षीय सत्यवान राजपूत असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्यवीरची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे आग्रा इथे त्याच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती या कुटुंबाने दिली. आता अतुल कुमार अशी ओळख सांगून मृतदेह घेऊन जाणारी माणसं कोण असा प्रश्न उपस्थित झाला आणि हे प्रकरण चांगलंच गुंतागुंतीचं झालं. साहजिकच पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला.
तपास सुरू करताच पोलिसांना चांगलाच धक्का बसला. कारण मृत व्यक्ती अतुल कुमार आहे असा दावा करून मृतदेह ताब्यात घेणाऱ्या व्यक्तींनी दिलेली, मृताच्या आधार कार्डासह सगळी कागदपत्रं नकली होती. म्हणजेच हा मृतदेह ताब्यात घेणं ही चूकभूल नसून नियोजित होतं, हे पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळे पोलिसांनी आपल्या तपासाचा मोर्चा मृतदेह घेऊन गेलेल्या चार व्यक्तींकडे वळवला.
योगायोगाने पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या चारही व्यक्तींचा चेहरा स्पष्ट दिसला. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता चारपैकी हेतराम मित्तल नामक एका व्यक्तीचा शोध लागला. ही व्यक्ती म्हणजे वकील हेतराम मित्तल असल्याचं स्पष्ट झालं. मित्तलला पकडल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फारुक, तसलीम आणि फुरकान या त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं. या सगळ्यांनी खोटी कागदपत्रं सादर करून सत्यवीर राजपूतचा मृतदेह हा अतुल कुमारचा मृतदेह आहे असा दावा करून तो ताब्यात घेतला होता. प्रत्यक्षात अतुल कुमार नावाची कोणी व्यक्तीच अस्तित्वात नसल्याचं या तपासादरम्यान स्पष्ट झालं.
हेतराम मित्तल या वकिलाला आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी एक मृतदेह का हवा होता हा प्रश्नही आता उपस्थित झाला. त्याचं उत्तर असं, की अतुल कुमार हा आपली प्रेयसी मुस्कान हिचा पहिला पती आहे असं भासवून त्याच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात मुस्कानच्या कुटुंबीयांना अडकवण्याचा हेतरामचा डाव होता; मात्र आपल्या अल्पवयीन मुलीला फसवल्याप्रकरणी मुस्कानच्या कुटुंबीयांनी आधीच त्याच्यावर केस दाखल केलेली होती.
हा उलगडा झाल्यानंतर हेतराम मित्तल याची पत्नी शिखा अगरवालही समोर आली. तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. 50 वर्षीय मित्तल याने आतापर्यंत तीन लग्नं केल्याचं तिने सांगितलं. पैशांची लालच दाखवून मुलींना फसवणं, त्यांच्याशी लग्न करणं आणि नंतर त्यांना मारहाण करणं ही मित्तलची पद्धत असल्याचं शिखा हिने पोलिसांना सांगितलं. मित्तल आणि शिखा अगरवाल यांना दोन मुलं आहेत.