एसटी महामंडळाच्या बसणे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला देखील स्वस्तात वातानुकुलीत बसमधून आरामदायक प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. कारण एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता 5150 ई बसेस दाखल होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी वातानुकूलित आणि किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या ई-बसेसचे लोकार्पण होणार आहे.
ठाणे येथील खोपट बसस्थानकावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमानंतर एसटी महामंडळात आजपासून 5150 वातानुकूलित ई-बसेस दाखल होणार आहे. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास हा आणखी सुलभ आणि किफायतशीर होणार आहे.
केवळ 2 तासांत पूर्ण होते चार्जिंग
मिळालेल्या माहितीनुसार 5150 वातानुकूलित ई-बसेससाठी राज्यातील 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जींग स्थानके निर्माण केली जात आहे. या बसेस केवळ २ तासांत पूर्ण चार्ज होतात आणि ही बस एका चार्जिंग मध्ये 200 किमी धावू शकते. या बसची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर बोरीवली-ठाणे-नाशिक या मार्गाने होणार आहे. बसेसच्या या ताफ्यामध्ये 34 आसनी मिडी बसही असणार आहे. या बसेस संपूर्णपणे वातानुकूलित असणार आहेत.
किती असेल बसचे भाडे?
बसच्या भाड्याबद्दल बोलायचे झाले तर बोरीवली ते नाशिक मार्गावर प्रवास करण्यासाठी नागरिकांना 405 रुपये मोजावे लागणार आहेत, तर ठाणे ते नाशिक मार्गावरून प्रवास करण्यासाठी 340 रुपये भाडे आकारले जाणार आहे. तसेच यात महिला आणि 65 ते 75 वर्ष दरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे, तर अमृत ज्येष्ठ म्हणजेच 75 वर्षावरील नागरिकांना तिकिटात शंभर टक्के सवलत असणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या बसमधून सुरक्षित आणि मोफत प्रवास करता येणार आहे.
5000 बस डिझेलऐवजी LNG वर धावणार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 5 हजार डिझेल बसेस आता एलएनजीवर धावणार आहेत. मागील आठवड्यात एसटीच्या 5 हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या एलएनजी इंधन वापरामुळे एसटीच्या प्रदुषणामध्ये सुमारे 10 टक्के घट होणार आहे. तसेच महामंडळाची दरवर्षी 234 कोटी रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि स्वस्त प्रवासाची सुविधा देखील मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.