मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमध्ये लग्नाचा वाढदिवस विसरणे एका पतीला चांगलेच महागात पडले आहे.
पती लग्नाचा वाढदिवस विसरला म्हणून घाटकोपर येथील एका 27 वर्षीय महिलेने तिचा भाऊ आणि आई-वडिलांसह तिच्या नवऱ्याला आणि सासूला चोप चोप चोपले आहे. 18 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
महिलेचा नवरा लग्नाचा वाढदिवस विसरल्याने संतापलेल्या महिलेने तिचे आई-वडील आणि भावाला तिच्या सासरी बोलावले. ते घरी पोहोचल्यानंतर चौघांनी तिच्या पतीला व त्याच्या आईला बेदम मारहाण केली आणि त्याच्या वाहनाचेही नुकसान केले. या चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ‘या प्रकरणाची अधिक चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.’ असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विशाल नांगरे (32) हा कुरिअर कंपनीत चालक असून त्याची पत्नी कल्पना ही एका फूड आऊटलेटमध्ये काम करते, दोघेही गोवंडीच्या बैगनवाडी येथे राहतात. या जोडप्याने 2018 मध्ये लग्न केले. 18 फेब्रुवारी रोजी पती लग्नाचा वाढदिवस विसरला याचा पत्नीला भयंकर राग आला. त्यामुळे पत्नीने पतीसोबत भांडण केले. दुसर्या दिवशी संध्याकाळी पती घराजवळ आपले वाहन धुत असताना. कल्पना कामावरून परतली आणि पाटील आणि त्याच्या आईला शिवीगाळ करू लागली. यावेळी ‘मला आता तुझ्यासोबत राहायचे नाही, असे पत्नीने म्हटले.
त्यानंतर तिने तिच्या भावाला आणि पालकांना बोलावले आणि पतीच्या वाहनाचे नुकसान केले आणि त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. वाद सुरू असताना कल्पनाने तिच्या सासूच्या कानाखाली मारली, ज्यामुळे वाद आणखी वाढला आणि दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याची पत्नी, तिचा भाऊ आणि तिच्या पालकांविरुद्ध कलम 323, 324, 327, 504 आणि 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.