धानोरा – येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री एस डी घुले.
———-
विद्यार्थ्यांनी जात वैधता समितीकडे प्रस्ताव दाखल करावेत – घुले
आष्टी : (बातमीदार)- कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी व बारावी ( विज्ञान) मध्ये शिक्षण घेत असलेल्या
खुला प्रवर्ग वगळता इतर सर्व जाती जमातीतील विद्यार्थ्यांनी जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आपले प्रस्ताव ऑनलाईन सादर करून त्याची मूळ प्रत बीड येथील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावे असे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्या बीड येथील जात वैधता समितीचे मुख्य लिपिक एस डी घुले यांनी बुधवारी (ता.८) कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयात विद्यार्थांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी व कर्मचारी हे भेटी देऊन विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी शिबिर घेऊन मार्गदर्शन करत आहेत. पुढे बोलताना श्री घुले म्हणाले की, ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मेडिकल इंजिनिअरिंग लॉ कॉलेज व इतर उच्च शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यासाठी विद्यार्थांनी वेळेत प्रस्ताव सादर केल्यास त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होणार नाही. तसेच प्रस्ताव सादर करताना कोणालाही पैसे देऊ नये असे आवाहन ही त्यांनी यावेळी सांगितले. या शिबिरा प्रसंगी उपप्राचार्य कैलास वयभासे, पर्यवेक्षक प्रा निसार शेख यांनी ही विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या शिबिराला मोठ्या प्रमाणात विद्यार्थांनी सहभाग नोंदवला होता.