ताज्या बातम्यापुणे

पुणे : ‘कमळाबाई’ काहीही करू शकते; अजित पवार यांच्या सूचना


पुणे : कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजप, महाविकास आघाडीसह इतर पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.

कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. तर चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे यांचीही जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्याबाबदत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शहर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, चिंचवड आणि कसबा या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुका सहानुभूतीवर नव्हे तर विकासावर लढवायची आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे काम करावे, प्रचारासाठी चिंचवडला जावे; पण कसब्याकडेही दुर्लक्ष करू नका, असे पवार यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने चिंचवड व कसब्याची पोटनिवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. ‘कमळाबाई’ काहीही करू शकते, त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी. वेळ कमी अन् काम जास्त अशी अवस्था असल्याने विजय मिळविण्यासाठी कुठेही कमी पडू नका, अशा सूचनाही पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

कसब्यात तब्बल 40 वर्षे भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. ते या पोटनिवडणुकीत कमी करणारच, असा निर्धार काँग्रेस भवनमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तिन्ही पक्षांचे प्रमुख, तसेच आघाडीत असलेल्या अन्य संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *