मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचं अनावरण विधानभवनातील सेन्ट्रल हॉलमध्ये झालं. यावेळी बाळासाहेबांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आज मी राजकीय पक्ष काढू शकलो तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
राज ठाकरे म्हणाले, “मी लहानपणापासून अनेक गोष्टी बघितल्या. पराभव झालेले लोक बाळासाहेब ठाकरेंकडं यायचे तेव्हा त्यांना सांभाळणारे बाळासाहेब, निवडून येणाऱ्या लोकांशी बोलणारे बाळासाहेब, वेगवेगळ्या पर्सनॅलिटी यायच्या तेव्हा त्यांच्याशी कशा पद्धतीनं बोलणारे बाळासाहेब हे सगळं मी लहानपणापासून मी असं विलक्षण व्यक्तीमत्व मी पाहत आलो”
“मी खरं सांगतो लहानपणापासून मी त्यांच्या सहवासात राहिलो म्हणून मी त्यांच्या ज्या गोष्टी पाहू शकलो त्यामुळेच मी स्वतःचा एक राजकीय पक्ष काढू शकलो नाहीतर माझी हिम्मत झाली नसती. त्यामुळं यश आलं तरी हुरळून जात नाही, पराभव झाला तरी खचून जात नाही.
वारसा हा वास्तूचा नसतो विचारांचा असतो. बाळासाहेबांचं माझ्याकडे काही आलं असेल आणि जर मी काही जपलं असेल तर तो त्यांचा विचारांचा वारसा जपला आहे,” असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांवर मी फोटोबायोग्राफी देखील तयार केली होती. हे पुस्तक तयार करताना मी जवळपास १८ हजार फोटो पाहिले होते. त्यापैकी मी सातशे-आठशे फोटो निवडले. यामध्ये मी सर्व बाळासाहेबांचा आलेख बघत आलो आहे.
हीच माझ्यासाठी मी मनापासून बाळासाहेबांना आज श्रद्धांजली आहे. इतके शिलेदार त्यांनी या विधानभवनात पाठवले त्या बाळासाहेबांचं तैलचित्र आज इथे लागतंय याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.