कोरोनाच्या काळातही घरातील सदस्य एकामागोमाग एक कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं तुम्ही पाहिलं आहे. पण सध्या असं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे लोक तर दहशतीत आहेतच. पण डॉक्टरही हैराण झाले आहेत आणि आरोग्य विभागातही खळबळ उडाली आहे. अख्खं कुटुंब एका अज्ञात आजाराच्या विळख्यात सापडलं आहे.
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुरमधील ही घटना आहे. बडागावातील हे कुटुंब, विचित्र गंभीर आजाराने ग्रस्त आहे. एकाच वेळी कुटुंबातील सर्व आठही सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माहितीनुसार या सर्व लोकांच्या त्वचेचा रंग काळा पडतो आहे, त्यांची बोटं वाकडी होत आहेत. संपूर्ण शरीर सैल पडतं आहे. या कुटुंबातील एका मुलीचा मृत्यूही झाला आहे. तर एका मुलाची प्रकृती गंभीर आहे.
डॉक्टरांची टीम या गावात गेली. सर्व डॉक्टरांनी शक्य ते सर्व उपचार करून पाहिले पण काहीच फरक पडत नाही आहे. नेमका हा आजार काय आहे, कशामुळे होतो आहे, त्यावर उपचार काय याची माहिती अद्यापही डॉक्टरांना मिळाली नाही. सध्या या सर्वांना मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयातदाखल करण्यात आलं आहे. जिथं न्यूरोलॉजिकल डिसीजवरील तज्ज्ञांमार्फत तपासणी केली जात आहे. आजाराचं कारण समजल्यावरच त्यावर उपचार होतील.
माहितीनुसार हे लोक मजुरीचं काम करतात. सहा महिन्यांपूर्वी या कुटुंबातील एका व्यक्तीच्या शरीराला खाज आल्यासारखी वाटू लागलं. त्यानंतर त्याच्या त्वचेचा रंग काळा पडू लागला. सुरुवातीला त्याने गावातच उपचार करून घेतले. पण फरक पडला नाही म्हणून त्याने शाहजहांपूरमधील एका खासगी डॉक्टरांकडून उपचार करायला सुरुवात केली. पण शरीराचा काळेपणा वाढतच गेला.
त्यानंतर हळूहळू कुटुंबातील सर्व आठही लोक आजारी पडले.