पुणे : मूलबाळ होत नसल्याने अघोरी पूजा करायला सांगून मानवी हाडाची पावडर करून विवाहितेला जबरदस्तीने खायला देणे, स्मशानभूमीतून हाडे, राख आणून त्याची पूजा करून ती राख पाण्यात मिसळून विवाहितेला पिण्यास लावणे, मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके याचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील धायरी भागात घडल्याचे नुकतेच समाेर आले आहे.
धायरी येथील विवाहितेच्या सासरी २७ एप्रिल २०१९पासून हा अघाेरी प्रकार सुरू होता. हा त्रास असह्य झाल्याने २८ वर्षांच्या विवाहितेने ॲड. हेमंत झंझाड यांच्या पुढाकाराने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पती जयेश पोकळे, दीर श्रेयश, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती कृष्णा पोकळे (सर्व रा. धायरी), दीपक जाधव, बबिता जाधव (दोघेही रा. प्राधिकरण, निगडी) यांच्याविराेधात विवाहितेचा छळ, नरबळी व अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
अमावस्येला काळे कपडे घालून पूजा
फिर्यादी विवाहितेचे बीई कॉम्प्युटर शिक्षण झाले आहे. त्यांचा जयेश याच्याबरोबर २७ एप्रिल २०१९ रोजी विवाह झाला हाेता. विवाहितेच्या सासरकडील लोक प्रत्येक अमावास्येला एकत्र जमून काळे कपडे घालून तळघरातील खोलीमध्ये काहीतरी करत असत. कोरोना महामारीच्या काळात तिच्या सासरची आर्थिक परिस्थिती ढासळायला लागली. त्यामुळे २२ मे २०२० रोजी अमावास्येच्या दिवशी त्यांनी अघोरी पूजा मांडली.
एका अमावास्येला रात्री तिचे दीर, जाऊ, पतीसह सर्व जवळच्या स्मशानभूमीमध्ये जाऊन तेथे जळलेल्या मृतदेहाची काही हाडे गोळा केली. राख मडक्यात घेतली. घरी आणून त्याची पूजा केली. राख पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी फिर्यादीला पिण्यासाठी दिले.