बीड घरकुल योजना आणि पगार सुरू करण्याचे आमीष दाखवून 68 वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार
बीड : जिल्ह्यात एका 68 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही महिला न्यायालयीन कामानिमित्त वडवणी तहसील कार्यालयात आली असता ओळखीच्या लोकांनी तिला 6 जानेवारीला शहराबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
महिलेने या संदर्भात तक्रार दिली आहे. आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. मात्र पीडितेने हिम्मत करून पोलिसात तक्रार केली.
ही महिला शेताच्या दाव्याची तारीख असल्याने 6 जानेवारी रोजी मुंबईहून वडवणी येथे आली होती. काम आटोपल्यानंतर गावातील काशिनाथ शेंडगे याच्यासोबत महामार्गालगत असलेल्या हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबली होती. यावेळी वडवणी तहसील कार्यालया बाहेर काम करणारा राजू उदगिरे आणि त्यासोबतच्या तहसील कार्यालयात कार्यरत कोपुरवाड नावाच्या व्यक्तीने पीडितेला घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याचे त्याचप्रमाणे पगार चालू करून देण्याचे आमीष दाखविले. पीडितेने आरोपींना महत्त्वाची कागदपत्रे, आधारकार्ड आणि 500 रुपये दिले. यानंतर तिला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगण्यात आले.
पीडिता 9 जानेवारीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वडवणीला आली आणि राजू उदगिरे याला भेटली. तिने त्याला दिलेली कागदपत्रे आणि पैसे परत करण्याची मागणी केली. यानंतर उजगिरे तिला कर्मचारी कोपुरवाड याच्याकडे घेऊन गेला. चिंचवडच्या सरकारी दवाखान्यात जाऊन साहेबांची सही घेऊन येऊ, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर राजू उदगिरे आणि कोपुरवाड हे महिलेला घेऊन दवाखान्यात पोहोचले. परंतु, पीडितेकडे आधार कार्ड नसल्याने डॉक्टरांनी तिला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. आरोपींनी परतताना सायंकाळच्या सुमारास मधेच गाडी थांबविली आणि पीडितेला, तू चल माझ्यासोबत, मला तुझ्या सोबत संबंध करायचे आहेत असे सांगितले.
आरोपींच्या मागणीमुळे पीडितेने घाबरून त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. यानंतर दोघांनीही पीडितेला बळजबरीने उचलून बाजूच्या खड्ड्यात नेले आणि जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. घटनेबाबत कोणालाही काही सांगितल्यास आम्ही तुला जीवे मारू अशी धमकी दिली. नंतर आरोपींनी महिलेला मोटरसायकलवरून तहसील कार्यालयात आणून सोडले आणि दोघेही निघून गेले. पीडितेने घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार केली.