दोन शेजाऱ्यांचे एकाच महिलेवर प्रेम जडले एकाने दुसऱ्याचा चाकू पोटात भोसकून केला खून
हिंगोली येथील दोन शेजाऱ्यांचे एकाच महिलेवर प्रेम जडले. त्या महिलेवरुन दोघांमध्ये इतका वाद झाला की तो वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. अखेर एकाने दुसऱ्याचा चाकू पोटात भोसकून खून केला.
प्रकरणी 10 जानेवारी रोजी न्यायालयाने निकाल देताना आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
ही घटना हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला गावातील आहे. या गावातील किशोर किर्तने आणि गणपत किर्तने हे शेजारी होते. दोघेही जवळा बाजार येथे मजुरीसाठी जायचे. दरम्यान दोघांची तेथील एका महिलेसोबत मैत्री झाली. दोघांपैकी किशोर विवाहीत होता आणि त्याला दोन वर्षांचा मुलगा होता. मात्र गणपत अविवाहीत असल्याने महिला त्याच्यामध्ये घट्ट मैत्री जमली होती. मात्र किशोरलाही त्यांची मैत्री खटकत होती. त्यामुळे किशोर मैत्रीचा फायदा घेत महिलेवर हक्क गाजवू लागला आणि तिला मारहाण करायला लागला. मात्र किशोरच्या अरेरावीने महिला त्रस्त होती. अखेर 24 जानेवारी 2018 रोजी ती महिला किशोरच्या घरी गेली आणि त्याच्या पत्नीला तिने किशोरच्या वागणूकीबाबत हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी महिलेने किशोरला गणपतच्या घरी फोन करुन बोलावून घेतले. संतापलेल्या गणपतने किशोरला तिला तू मारहाण का करतोस याचा जाब विचारला. त्यावरुन दोघांमध्ये वाद पेटला आणि तो हाणामारीपर्यंत पोहोचला. अखेर संतापलेल्या गणपतने घरातील चाकू आणून किशोरच्या पोटात खुपसला. त्यानंतर तो चाकू घेऊन गणपतने पोबारा केला.
खूनाच्या खटल्यात किशोरची पत्नी सुजाता आणि गणपतचा शेजारी उत्तम धबडगे साक्षीदार आहेत. त्यानंतर किशोरची आई कमलाबाई यांनी आरोपी गणपतला पळताना पाहिले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किशोरला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. किशोरची आई कमलाबाई किर्तने यांच्या तक्रारीवरुन गणपत याच्याविरुद्ध हट्टा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सबळ पुरावे आरोपी विरोधात असल्याने जिल्हा व सत्र न्यायालय वसमत येथे दोषारोप पत्र दाखल केले. त्यानंतर गणपत कीर्तने याच्याविरुद्ध वसमत येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालवून 11 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
त्यावरुन गणपत किर्तने याच्याविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.शी देशमुख यांनी आरोपीचा खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.