सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर सौर ज्वाळा म्हणजे सोलर फ्लेयरमुळे (Solar Flare) स्फोट होतात. गेल्या चार वर्षांतील सूर्याच्या पृष्ठभागावर हा सर्वात मोठा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट ‘AR 2838’ नावाच्या सनस्पॉटवर झाला आहे. AR 2838 हा आतापर्यंतचा चार वर्षांतील सर्वात मोठा सोलर फ्लेअर स्फोट असल्याचे मानले जाते. या स्फोटाला X1.5 श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. या सौर स्फोटाकडे नवीन सौरचक्र म्हणून पाहिले जात आहे.
सूर्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला हा सनस्पॉट होता, त्यावर स्फोट झाला. येत्या काही आठवड्यांत हा सनस्पॉट जागा बदलण्याचीही शक्यता आहे. हा सनस्पॉट काही काळ त्याच जागी राहिला तर तो पृथ्वीवरूनही दिसू शकतो. अटलांटिक महासागरावरील शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउटमुळे पृथ्वीवरील सौरवादळाचे परिणाम जाणवले.
याधीही सूर्यावर झाले आहेत स्फोट
सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही नासाने आपल्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेचा वापर करून सौरवादळाची फोटो टिपला होता. त्याच महिन्यात, CESSI जे सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सने या भारतीय संस्थेने सूर्याच्या पृष्ठभागावर भविष्यात होणाऱ्या स्फोटांची शक्यता असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्येही सूर्यावर सौरज्वालांमुळे मोठा स्फोट झाला होता.
मशीन्सचे नुकसान होते
सौर ज्वाळांमुळे मशीन्सचे नुकसान होते. तसेच पृथ्वीवरील विद्युत प्रवाह रोखण्यातही सौर ज्वाळांचा परिणाम होतो. एका रिपोर्टनुसार, सौर ज्वाळांमुळे पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात वरच्या थराचे आयनीकरण झाले, ज्यामुळे विद्युत प्रवाह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 60-100 किमी दरम्यान वाहू लागला. परिणामी, पृथ्वीचे ध्रुवीय चुंबकीय क्षेत्र बदलले.
सौर स्फोट किंवा सौरवादळ म्हणजे काय?
सौर स्फोट (Sun Explosion) किंवा सौरवादळ (Sun Strom) म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या सौर ज्वाळा (Sun Flare) तयार होतात. सूर्यावरील चुंबकत्वामुळे तापमान वाढून हे स्फोट होतात. या स्फोटामुळे नंतर सौर वादळ तयार होतं. सूर्यावर होणारे स्फोट अणुबॉम्बइतके शक्तिशाली असू शकतात, यावरून तुम्ही या धोक्याचा अंदाज लावू शकता. सूर्यावरील वायूंचे घर्षण होऊन स्फोट होतात, तेव्हा त्यातून ज्वाला बाहेर पडतात, याला सौर ज्वाळा (Sun Flare) म्हणतात. या ज्वाळानंतर ते पृथ्वीच्या तसेच सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या दिशेने फेकल्या जातात.
सौरवादळाचा पृथ्वीवर काय परिणाम होईल?
सौर ज्वाळा पृथ्वीच्या दिशेने आल्यास याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. या सौर ज्वाळामुळे ज्वालामुखी आणि रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड्स, GPSवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अंतराळयान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.