२०२१ साली भारताची लोकसंख्या १.३९ अब्ज, तर चीनची लोकसंख्या १.४१ अब्ज होती. मात्र २०२३ साली लोकसंख्येबाबत भारत चीनला मागे टाकणार आहे. जगातील संभाव्य महाशक्ती अशी ओळख असलेला भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणूनही पुढील वर्षीपासून ओळखला जाण्याची शक्यता आहे.
जगाची एकूण लोकसंख्या आता ८०० कोटींवर पोहोचली असून, हा मानवाच्या इतिहास व विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे.
पृथ्वीतलावर असलेल्या माणसांच्या लोकसंख्येबरोबरच त्यांच्या जबाबदारीतही वाढ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
जगातील लोकसंख्या मंगळवारी ८०० कोटींवर पोहोचणार असल्याचे संयुक्त राष्ट्रे व इतर काही संस्थांनी म्हटले होते. जागतिक स्तरावर वाढत्या लोकसंख्येबरोबरच अन्न, पाणी यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. हवामान बदलामुळे ऋतूचक्रात बदल होत असून, त्यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस यांचे प्रमाण वाढले आहे.
प्रदूषणाची पातळी वाढल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. इतक्या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी मानवाने अधिक सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी जगातील प्रत्येक देशाने लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण प्रभावीपणे राबविले पाहिजे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी वेळोवेळी केले आहे. (वृत्तसंस्था)
विकसनशील, गरीब देशांत अधिक लोकसंख्या
जगात विकसित, विकसनशील व तिसऱ्या जगातील गरीब देश असे तीन तट आहेत. अमेरिकेसह पाश्चिमात्य देश विकसित गटात, तर भारत, चीनसारखे देश विकसनशील देशांच्या गटात मोडतात. आफ्रिका खंडातील अनेक गरीब देशांकडे अद्याप पुरेशा पायाभूत सुविधाही नाहीत.
कोरोना काळात जाणवली अधिक विषमता
कोरोना साथीच्या काळात जगातील विषमतेच्या दरीचे अधिक भेसूर दर्शन झाले. अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडे पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होत्या. तर गरीब देशांकडे लसींचा मोठा तुटवडा होता. ही दरी अद्याप भरून निघालेली नाही. तिसऱ्या जगातील गरीब देशांमध्ये तसेच भारत, चीनसारख्या विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण मोठे आहे. पाश्चिमात्य देशांत लोकसंख्येवर उत्तम नियंत्रण राखण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची भौतिक प्रगतीही उत्तम झाली आहे.
२०८० सालानंतर लोकसंख्येत होणार नाही फारशी वाढ
२०३० सालापर्यंत जगाची लोकसंख्या ८.५ अब्जांवर पोहोचणार आहे. २०५० मध्ये हाच आकडा ९.७ अब्ज, तर २०८० मध्ये १०.४ अब्जांवर पोहोचणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी याआधीच व्यक्त केला आहे. २०८० नंतर जगातील लोकसंख्येत वाढ होणार नाही. २०८०मध्ये जगाची जितकी लोकसंख्या असेल, तितकीच ती २१०० सालीही राहण्याची शक्यता आहे.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या