ताज्या बातम्यामुंबई

राज्यात आजपर्यंत पत्रकार परिषदेत एवढे खोटे बोलल्याचे मी कधीही ऐकले नव्हते – आदित्य ठाकरे


शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातून अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहे. याचे खापर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडले.
उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांची शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी चिरफाड करत महाराष्ट्रापुढे सत्य मांडले.

ताज्या बातम्या वाचा व जगाशी रहा कनेक्टेड त्यासाठी आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा.https://chat.whatsapp.com/K7qwAEPs0s7LfJmVAQIP2I

आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘राज्यात आजपर्यंत पत्रकार परिषदेत एवढे खोटे बोलल्याचे मी कधीही ऐकले नव्हते किंवा पत्रकार परिषदेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही पाहिले नव्हते. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या टीमकडून चुकीची माहिती मिळालीय. फडणवीसांनी सुभाष देसाई यांची जानेवारी 2020 मधील एक बातमी दाखवली. ही बातमी त्यांनी पूर्ण वाचली असती तर त्यांना सर्व लक्षात आले असते. त्यांनी उल्लेख केलेला फॉक्सकॉनचा प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ योजनेतून महाराष्ट्रात आला होता. 2016मध्ये या प्रकल्पाची एमओव्ही साईन करण्यात आली होती. ही कंपनी महाराष्ट्रात मोबाईलची निर्मिती करणार होती. मात्र त्यानंतर फॉक्सकॉनने तमिळनाडूत जागा पाहिली आणि नंतर यूएसमध्ये जागा पाहून उत्पादन सुरू केले.’

‘महाराष्ट्रात पाच वर्ष न आल्याने एमओव्हीची जी जागा निश्चित केलेली ती लॅप्स झालेली, त्याचे उत्तर सुभाष देसाई यांनी विधानभवनातही दिले. हा प्रकल्प जरी फॉक्सकॉन कंपनीचा असला तरी यामध्ये आणि वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमी कंडक्टर चीपसाठी होता, तर मोबाईल फोनसाठी नव्हता. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोडून द्यावा. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सोडून द्या. दोन्ही वेगळे प्रस्ताव आहेत’, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

खोके सरकारकडून एक पोस्ट व्हायरल केली जातेय. यात सिनार मास पल्प अँड पेपर प्रकल्प रायगडात आम्ही आणल्याचा दावा केलाय. परंतु दावोसमध्ये असताना नितिन राऊत, सुभाष देसाई आणि माझ्या उपस्थितीत या प्रकल्पाचा एमओव्ही साईन झाला होता. हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात आलेला आहे. एमआयडीसीने 23 मे 2022 ला एक ट्विट केले होते, असा पुराव्यासह खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला

स्क्रीप्ट वाचून का होईना पण मुख्यमंत्र्यांनी बोलावे

खरेतर आज उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. परंतु राज्याचे जे प्रमुख असतात साधारपणे मुख्यमंत्री त्यांच्याकडून उत्तर येणे अपेक्षित होते. पण एक चांगले झाले की उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतल्याने त्यांना माईक खेचायची, चिठ्ठी देण्याची किंवा कानात सांगायची मेहनत करावी लागली नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिले तेच उत्तर कदाचित मुख्यमंत्रीही परत देतील. आमची हीच अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी यावर बोलावे. भलेही स्क्रीप्टमधून आले असेल, वाचून बोलले तरी चालेल. कारण हे घटनाबाह्य सरकार असले तरी त्यांच्याकडून हे उत्तर अपेक्षित आहे, असेहे आदित्य ठाकरे म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *