छतरपूर: मध्यप्रदेशातील छतरपूरमध्ये प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक घटना घडली आहे. जिल्हा रुग्णालयात एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, पण रुग्णालयाने रुग्णवाहिका न दिल्यामुळे मुलीच्या मामाने मृतदेह खांद्यावर उचलून नेला.
बरेच अंतर चालल्यानंतर तो बस पकडून आपल्या गावी पोहोचला.
मामाने सांगितली आपबीती
छतरपूर जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी अंतरावर असलेल्या बजना येथील पाटण गावात राहणारे मुलीचे मामा किशोरी अहिरवार यांनी सांगितले की, “बुधवारी सकाळी 10 वाजता माझी भाची प्रीती तिच्या दोन मैत्रिणींसोबत नदीच्या काठावर खेळत होती. मी सुद्धा तिथेच आंघोळ करत होतो. तो परिसर चिखलमय झाला होता, ज्यामुळे प्रीती चिखलात गाडली गेली. तिच्यासोबत खेळणाऱ्या दोन मैत्रिणी रडू लागल्या. तिचा आवाज ऐकून मी पोहोचलो आणि प्रीतीला तात्काळ रुग्णालयात आणले.”
2 तास भटकलो, पण रुग्णवाहिका मिळाली नाही
“तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला छतरपूर जिल्हा रुग्णालयात रेफर केले. पण, वाटेतच तिचा मृत्यू झाला. मी मृतदेह घरी आणण्यासाठी अॅम्ब्युलन्स मागितली, पण मला अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. मी 2 तास हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे भटकलो. रात्र झाली होती, म्हणून मी भाचीला चादरीत गुंडाळून खांद्यावर ठेवले अन् पायी चालत निघालो. चौकातून रिक्षा घेऊन नाक्याला पोहोचलो आणि तिथून बसने गावी आलो.”
अधिकारी जबाबदारीतून पळ काढत आहेत
स्थानिक आमदाराने रुग्णालयाला एक रुग्णवाहिका दिली होती. पण ती रुग्णवाहिका गरजुंना मिळत नाही. जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. जीएल अहिरवार यांनी सांगितले की, आमदाराने दिलेली रुग्णवाहिका एका क्लबच्या स्वाधिन दिली आहे, तो क्लब रुग्णवाहिका चालवतो. त्यांनाच याचे कारण माहित असेल. तर, त्या क्लबचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे कोणताच व्यक्ती मदत मागायला आला नाही.