प्रभू राम फक्त हिंदूंचेच का? ते ब्रिटिश आणि रशियन लोकांचेही देव आहेत – फारुख अब्दुल्ला
छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भुजबळ यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाला फारुख अब्दुल्ला देखील उपस्थित होते.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देशात काश्मीर राहिलं, त्यात फारुख अब्दुल्ला यांच्या वडिलांचं योगदान मोठ असल्याचं म्हटलं. तसेच अब्दुल्ला कुटुंबाची संपूर्ण निष्ठा कायम भारताच्या ऐक्याशी राहिलेली आहे, असंही पवार यांनी म्हटलं.
पवार यांच्या गौरवोद्गारानंतर अब्दुल्ला यांनी भारताविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भारताला काँग्रेसच्या धर्तीवर जोडण्याबाबत विधान केलं. अब्दुल्ला म्हणाले, ‘मी मुस्लिम आहे, पण चिनी मुस्लिम नाही. मी भारतीय मुस्लिम आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताला जोडून ठेवायचे आहे. आपल्याला भारताला एकत्र करायचे आहे. आपण सगळे वेगळे आहोत, पण आपण एकत्र येऊनच भारत घडवू शकतो. कारण धर्म एकमेकांशी वैर ठेवायला शिकवत नाही. हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा, असंही अब्दुल्ला म्हणाले.
फारुख अब्दुल्ला पुढं म्हणाले की, धर्म भिन्न आहेत, पण ते आपल्याला एकत्र करतात. प्रभू राम फक्त हिंदूंचेच का? ते ब्रिटिश आणि रशियन लोकांचेही देव आहेत. पण प्रत्येकाला वेगळे केले जात आहे. जो सर्वांचा आहे, त्याच्यासमोर आम्ही मशिदीत जाऊन नमाज अदा करतो? असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं.