पहिली पत्नीही फिर्यादीला फोनवरून धमकावत असे. गर्भवती असताना पतीने फिर्यादीला पोटावर मारहाण केल्याने तिचा गर्भपात झाला. फिर्यादीने पहिल्या पत्नीच्या आईला सांगूनही तिने फिर्यादीला शिवीगाळ केली. हवाई सुंदरी आणि फिर्यादीचा पती दोघेही स्टाफ ट्रॅव्हलर म्हणून सोबत फिरत असतात. तिने तो आपला पती असल्याचे भासवत कंपनीचीही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुणे : पहिल्या पत्नीशी घटस्फोट झालेला असतानाही तिच्याशी अनैतिक संबंध ठेवत दुसऱ्या पत्नीला मारहाण करून तिची फसवणूक करण्याचा प्रकार घडला.
याबाबत पतीसह पहिली पत्नी आणि तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करा, असे आदेश लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.एन. अंधारे यांनी कोंढवा पोलिसांना दिले आहेत.
दरम्यान, कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज देऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पतीला अंतरिम पोटगीचा आदेश देऊनही त्याने फिर्यादीला पोटगी दिलेली नाही. याबाबत फिर्यादीने पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कोंढवा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देऊनही त्याची दखल घेतली नसल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीमधील सर्व कलमे दखलपात्र गुन्ह्यामध्ये मोडतात. हे सर्व गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे पोलिसांमार्फत या तक्रारीची चौकशी होणे गरजेचे आहे. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणाची फौजदारी गुन्हे संहितेच्या १५६ (३) अंतर्गत चौकशी करावी, असे आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार, पोलिसांनी पती इम्रान इलियास खान, पहिली पत्नी राधिका मदन चव्हाण आणि तिची आई रिना मदन चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवावे, असे आदेश दिले आहेत. ॲड.नीता भवर यांनी न्यायालयात फिर्यादीच्या बाजूने युक्तिवाद केला. त्यांना या केससाठी ॲड.तेजस्विनी कांबळे, ॲड.धनश्री बोऱ्हाडे आणि ॲड.रसिका मेढकर यांनी सहकार्य केले.
फिर्यादी ही इम्रान इलियास खान याची दुसरी पत्नी आहे. १७ जानेवारी, २०२१ मध्ये दोघांचा विवाह झाला. लग्नापूर्वी पतीचा पहिला घटस्फोट झाल्याचे फिर्यादीला माहीत होते. देहूरोड भागात फिर्यादी पती, सासू आणि सासरे यांच्याबरोबर राहत होती. लग्नानंतर पहिली पत्नी पतीच्या संपर्कात आली. ती एका खासगी एअरलाइन्स कंपनीत हवाई सुंदरी आहे. दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे फिर्यादीला कळले. सुधारण्याचे आश्वासन देऊनही पती सुधारला नाही.