कमी पटसंख्येच्या शाळा बंद पडू देणार नाही- तीव्र आंदोलनाचा शिक्षण बचाव नागरी समितीचा इशारा..
शिक्षण बचाव नागरी समिती जिल्हा बीड
=================
कमी पटसंख्येच्या शाळा बंद पडू देणार नाही-
तीव्र आंदोलनाचा शिक्षण बचाव नागरी समितीचा इशारा…
———————————-
सोमवारी सकाळी 11 वा निदर्शने !
या निर्णयामुळे श्रमिक-कष्टकरी वर्गाचे शिक्षण धोक्यात येणार
———————————–
बीड : वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण गोर ,गरीब , दीन दलितांच्या शिक्षणावर घाला घालणारे आणि या वर्गास शिक्षण प्रवाहाच्या बाहेर काढणारे आहे. त्यामुळे या शाळां बंद पडू देणार नाही आणि या धोरणास तीव्र विरोध करण्याचा इशारा शिक्षण बचाव नागरी समितीने दिला आहे. हा निर्णय रद्द करावा यासाठी सोमवारी सकाळी 11..00 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात येथील पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत ‘शिक्षण बचाव नागरी समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीचे निमंत्रक म्हणून राजकुमार कदम तर संघटक म्हणून डॉ. गणेश ढवळे यांची निवड करण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारची शैक्षणिक धोरणे श्रमिक-कष्टकरी वर्गाच्या विरोधातील आहेत, नाहीरे वर्गाला शिक्षण प्रक्रियेतून बाहेर काढणारी आहेत. महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी सर्व सामान्यांच्या दारात शिक्षण पोहंचवले मात्र विद्यमान राज्यकर्त्यांनी या महामानवांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यावरील आहेत. या शाळां बंद झाल्या तर या भागातील मुलांचे शिक्षण बंद होणार आहे. म्हणून या धोरणास विरोध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. वीस पटसंख्येच्या शाळा बंद करून सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याच्या धोरणास कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच भाग म्हणून सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारीकार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार आहेत. वीस पटसंख्येच्या शाळा बंद करण्यास विरोध करण्यासाठी पुरोगामी, परिवर्तनवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षण बचाव नागरी समिती बीडचे निमंत्रक राजकुमार कदम, संघटक डॉ. गणेश ढवळे, काॅम्रेड नामदेव चव्हाण, पी.एस.घाडगे, डॉ. सतीश साळुंके, उत्तमराव सानप, डी. जी. तांदळे, जे.एम.पैठणे, सुभाषराव गायकवाड, कालिदास धपाटे, गणेश आजबे, एम.ए.खान , शेरजमा पठाण, भाऊराव प्रभाळे, रोहिदास जाधव , मनोज जाधव, बबन वडमारे, अभिमान खरसाडे, रामहरी मोरे, नितीन रांजवण, ज्योतिराम हुरकुडे, सुहास जायभाये यांनी केले आहे.