महिलेच्या बेकायदा गर्भपाताला जबाबदार डॉक्टर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
महाड: एका महिलेच्या बेकायदा गर्भपाताला जबाबदार असल्याप्रकरणी महिलेचा पती व बिरवाडी येथील एक डॉक्टर यांच्याविरोधात महाड औद्योगिक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेमुळे गर्भलिंग तपासणी व गर्भपाताचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहणाऱ्या संबंधित महिलेला दोन मुली आहेत, परंतु तिला तिसरा मुलगा व्हावा म्हणून तिच्या पतीने तिला सातारा येथील डॉक्टरांकडून गर्भलिंग निदान करून घेतले. त्यानंतर मुलीचा गर्भ असल्याचे आढळून आल्यानंतर तिच्या पतीने आपल्या पत्नीचा गर्भपात करण्यासाठी २६ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत महाड तालुक्यातील बिरवाडी येथील डॉ. राजेंद्र केंद्रे यांच्या क्लिनिकमध्ये पत्नीला तिच्या संमतीशिवाय ॲडमिट करून घेतले.
यानंतर तिची कोणतीही परवानगी नसताना बेकायदा गर्भपात करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. महिलेला डिस्चार्ज दिल्यानंतर तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला पुन्हा पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु या ठिकाणी तिचा गर्भपात झाला. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये या महिलेचा पती प्रफुल्ल गुरव आणि डॉ. राजेंद्र केंद्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मारुती आंधळे करत आहेत.