आधी शिक्षक असललेल्या पोपट वनमोरे, त्यांच्या पत्नी, मुलगी यांना हा काळा चहा दिला. त्यानंतर पोपट यांचा मुलगा शुभमला घेऊन पशु डॉक्टर असलेल्या माणिक वनमोरेच्या घरी आले. तिथे माणिक वनमोरे, त्यांची आई, पत्नी, दोन्ही मुले आणि शुभमला चहा देण्यात आला. रात्रभर हा कट यशस्वी केल्यानंतर हे सगळे मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपींनी पहाटे 5 वाजता म्हैसाळमधून पळ काढत सोलापूर गाठले.
मिरज तालुक्यामधील म्हैसाळ गावातील एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषारी औषध देऊन त्यांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी प्रमुख आरोपी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवानसह चौघांविरुद्ध सांगली सत्र न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
म्हैसाळमधील डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधन शोधण्याचा नाद लागला होता. त्यांच्या संपर्कात सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान हा होता. ‘गुप्तधन शोधून देतो,’ असे सांगून वेळोवेळी त्याने पैसे उकळले होते. अखेर गुप्तधन मिळत नसल्याने वनमोरे यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. त्यावेळी मांत्रिकाने या कुटुंबाचा काटा काढण्याचे ठरविले.
19 जूनची तारीख वनमोरे यांना दिली होती. त्यानुसार मांत्रिक बागवान व त्याचा चालक धीरज सुरवसे त्या दिवशी सोलापूरमधून म्हैसाळला आले. रात्री नऊच्या सुमारास डॉ. माणिक यांच्या घरी दोघांनी जेवण केले. डॉक्टर दांपत्यास अकराशे गहू काढून दिले. ते सात वेळा मोजण्यास सांगितले. त्यानंतर त्याने घरातील लाईट बंद करण्यास सांगितली. लाईट बंद केल्यानंतर त्याने सर्वांना काळ्या चहातून विष देऊन त्यांचा खून केल्याचे तपासात समोर आले. मागील तीन ते चार वर्षांपासून हे वनमोरे बंधू या मंत्रिकाच्या संपर्कात होते. 19 जून रोजी आरोपी रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत म्हैसाळमधील वनमोरे कुटूंबाच्या घरी होते.