धुळे : धुळे शहरातील अवैध सावकार राजेंद्र बंब याचे प्रकरण राज्यभर गाजत असताना अवैध सावकारांचा हैदोस जिल्ह्यात अजूनही सुरूच आहे.
शहराप्रमाणे ग्रामीण भागातही अवैध सावकारी बिनबोभाटपणे सुरू आहेत. साक्री तालुक्यातील जैताणे निजामपूर येथे अवैध सावकारी एका मोबाईल व्यावसायिकाच्या जीवावर बेतू लागल्याने त्याने धुळे जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाच्या आदेशाने निजामपूर पोलीस ठाण्यात 14 अवैध सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यवसायिकाने या 14 जणांकडून एकूण 26 लाख 60 हजार रुपये घेतले होते. शेती विकून 10% व्याजदराने त्याने या कर्जाची परतफेड केली असे असताना या अवैध सावकारांनी या व्यवसायिकाचे कोरे चेक परत न देता अजून पैशांची मागणी आणि धमकावणे सुरूच ठेवले आहे.
साडेआठ एकर शेत जमीन विकून कर्जाची परतफेड
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जैताने निजामपूर येथील रहिवासी असणाऱ्या राहुल जयस्वाल यांचे मोबाईलचे दुकान आहे. त्यांनी आपल्या व्यवसायासाठी सन 2019-20 मध्ये पैशांची गरज असल्याने गावातील सावकारीचा धंदा करणाऱ्या 14 लोकांकडून वेळोवेळी 10% व्याजदराने पैसे घेतले. विशेष म्हणजे लोकांकडे सावकारीचा कोणताही परवाना नाही, कर्जाची रक्कम मोठी असल्याने या अवैध सावकारांनी राहुल जयस्वाल यांच्याकडून हमी म्हणून सह्या केलेले कोरे धनादेशही घेतले होते. ही कर्जाची रक्कम घेतल्यानंतर राहुल जयस्वाल यांनी टप्प्याटप्प्याने रोख स्वरूपात तसेच ऑनलाईनद्वारे व्यवसायातून आलेले उत्पन्न तसेच वडिलांची साडेआठ एकर शेत जमीन विकून कर्जाची परतफेड केली. मात्र 14 अवैध सावकारांनी राहुल यांना त्यांचे कोरे धनादेश परत न करता प्रत्येकाने त्यांच्याकडे पुन्हा एक लाख वीस हजारांची मागणी सुरू ठेवली त्यासाठी दमदाटी करून त्रास देणे सुरू केले इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांना वेळोवेळी धमकावले.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने न्यायालयात धाव
आमच्याकडे असलेल्या कोऱ्या धनादेशाचा वापर करत फौजदारी प्रकरणात अडकवण्याची धमकी ही राहुल यांना या अवैध सावकारांकडून दिली जात होती. तसेच या अवैध सावकारांनी हिरकण बच्छाव व भटेश्वर भलकारे यांच्या माध्यमातून मोबाईलचे दुकान हिसकावण्याचा देखील प्रयत्न केला. या अवैध सावकारांची गावात दहशत असल्याने त्यांच्या विरोधात कुणीही बोलण्याची हिंमत करत नव्हते. राहुल आणि त्याचा भाऊ स्वप्निल यांच्याकडे व्याजाच्या पैशांची मागणी करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. या अवैध सावकारांच्या त्रासाला कंटाळून राहुल यांनी 6 मे 2022 रोजी निजामपूर पोलिसात धाव घेतली. परंतु पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ही तक्रार केली. मात्र त्यांच्या आदेशानंतरही निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने अखेर राहुल यांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत 20 ऑगस्ट 2022 रोजी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.