आलमला ते उंबडगा (बु.) ओढ्यावरील वाहतुकीचा पूल गेल्या तीन वर्षापूर्वी पावसाच्या पाण्यामुळे पूर्णतः वाहून गेला आहे. तेव्हापासून औसा-आलमला-उंबडगा बु.-बुधोडामार्गे लातूर जाणारी आणि परत याच मार्गाने येणारी बस तीन वर्षांपासून बंद केली आहे. त्यामुळे उंबडगा बु. आणि उंबडगा खु. या दोन गावांतील विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे
लातूर : तीन वर्षापूर्वी मुसळधार पावसामुळे आलमला-उंबडगा ओढ्यावरील पूल वाहून गेला होता. तेव्हापासून आलमला गावाशी संपर्क तुटलेलाच आहे. त्यात दोन वर्षे कोरोनामुळे शाळेला जाता आले नाही.
यंदा उंबडगा येथील विद्यार्थ्यांना कधी कमरेएवढ्या तर कधी गुडघ्याएवढ्या पाण्यातून जात शाळेला जावे लागत आहे. याकडे ना प्रशासनाचे, ना लोकप्रतिनिधींचे लक्ष जात आहे. दुर्दैवी घटना घडल्याशिवाय हे लक्षच देणार नाहीत का असा प्रश्न आता गावकरी विचारत आहेत. विद्यार्थ्यांना जीवघेणा ओढा ओलांडून प्रवास करत आलमल्याची शाळा गाठावी लागत आहे. परंतु, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दिसून येत नसल्याने पालक व ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.