मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलीय.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांचे आभार मानले. त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही शिवसेनेचे केवळ चारच मंत्री उपस्थित होतो, अशा शब्दात खंत व्यक्त केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ‘मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाहीय. माझी इच्छा होती नव्हती तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला ठाकरे कुटुंब माहीत आहे. आम्ही हिंदूंसाठी काम करतो. मी सगळ्यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. तुम्ही प्रेम दिलं आशीर्वाद दिला, मी घाबरणारा नाही. उद्या कारण नसताना शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचं धनी व्हायचं नाही’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.