उज्जैन : दारुड्याने दारू चढत नाही म्हणून चक्क गृहमंत्र्यांकडे भेसळीची तक्रार केली आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील उज्जैनममध्ये घडला.
उज्जैनच्या बहादूर गंजमध्ये राहणाऱ्या लोकेंद्र सोठियाला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याने क्षीरसागर परिसरात असलेल्या दारूच्या दुकानातून चार क्वार्टर देशी दारू खरेदी केली. दोन वाटली दारू प्यायल्यानंतरही दारूची नशा झाली नाही. यामुळे त्याला दारूमध्ये भेसळ असल्याचे जाणवले. यानंतर त्याने याची तक्रार दुकानदाराकडे केली. मात्र, दुकानदाराने धमकावून हाकलून दिले. सोबतच दुकानदार धमकीच्या स्वरात म्हणाला ‘तुझ्याकडून जे होते ते करून घे’. यामुळे चिडलेल्या लोकेंद्रने याची वरच्या स्तरावर तक्रार करण्याचे ठरवले.
बाटलीत दारूऐवजी पाणी मिसळवले जात असल्याचा आरोप लोकेंद्रने केला आहे. दारूत भेसळ होत असल्याचे सिद्ध करण्यासाठी उर्वरित दोन क्वार्टर पॅक तसेच ठेवले आहे. जेणेकरून ते पुरावे म्हणून सादर करता येतील. लोकेंद्रने उज्जैनचे एसपी व गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना अर्ज करून कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणावर उत्पादन शुल्क अधिकारी रामहंस पचौरी यांचे म्हणणे आहे की, अद्याप तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. मात्र, तक्रार आल्यास या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.