बीड : एक हजार कोटींच्या देवस्थान जमीन घोटाळ्याच्या आरोपावर भाजप आमदार सुरेश धस यांनी अखेर मौन सोडत पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. तुमचं सरकार आहे चौकशी करा, ढगात गोळ्या मारू नका.
1 हजार कोटीचा आरोप करणाऱ्यांना माझ्याकडील, माझी वडिलोपार्जित व मी कमावलेली सगळी प्रॉपर्टी, मी त्यांच्या नावावर करतो. मला फक्त 50 कोटी द्या. मी घरदार सगळं सोडून जिल्हा सोडतो, असे आव्हान सुरेश धस यांनी तक्रारदारांना केलं आहे. खोटे आरोप करून बदनाम करु नका, असे देखील सुरेश धस म्हणाले आहेत. ते पाटोदा येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या.
राष्ट्रवादीचे आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड असीम सरोदे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन आष्टी तालुक्यातील देवस्थान आणि इनामी जमीनीमधील 200 हेक्टर जमीन बनावट दस्तऐवज करून सुरेश धस यांनी बळकावल्याचा आरोप केला होता.
या जमिनीची किंमत 1 हजार कोटी आहे, अशी तक्रार राम खाडे यांनी ईडीच्या कार्यालयात केली आहे. त्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तक्रारदारांना आव्हान दिले आहे. सुरेश धस म्हणाले, की ईडीकडे तक्रार केली, त्याना माझं म्हणणं आहे, की माझ्याकडे 1 हजार कोटीची जमीन संपत्ती आहे. त्याना माझं चॅलेंज आहे फक्त 50 कोटी द्या. मी माझी वडिलोपार्जित सगळी प्रॉपर्टी घर दार तुमच्या नावावर करून जिल्हा सोडून जातो. गेल्या अनेक दिवसांपासून जमीन हडपल्याच्या आरोपावर सुरेश धस यांनी जाहीर सभेत मौन सोडलं आहे.
सुरेश धस म्हणाले की, टीका टिपण्ण्या करताना दुसऱ्याच्या इज्जती घ्यायच्या. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप केले. उगाच ढगात गोळ्या सोडू नका, असंही धस म्हणाले.