बीड जिल्हा रूग्णालय कोरोनाकाळात अतिरिक्त कर्मचारी भरतीत आर्थिक गैरव्यवहार
कोरोनाकाळात अतिरिक्त कर्मचारी भरतीत आर्थिक गैरव्यवहार , सीईओचे आदेश डावलले, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री,प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य मंत्रालय, आयुक्त आरोग्य संचनालय मुंबई यांना तक्रार :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड जिल्हा रूग्णालयात कोविड १९ कालावधीत वाढीव मनुष्यबळापेक्षाही आधिकचे मनुष्यबळ नियुक्त करून गंभीर प्रशासकीय अनियमितता करत मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड,उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य, आयुक्त आरोग्य संचनालय मुंबई यांना केली आहे.
सविस्तर
_______
बीड जिल्हा रूग्णालयात कोविड १९ साथरोग परिस्थिती हाताळण्यासाठी कोविड आरोग्य संस्थेमध्ये कंत्राटी पद्धतीने तात्पुरती पदे नेमण्यासाठी दि.२७ /०७/२०२० रोजी जाहीरात देण्यात आली होती, सदर भरतीसाठी अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक व निवासी वैद्यकीय आधिकारी (बाह्य संपर्क)जिल्हा रूग्णालय बीड यांची द्विसदस्य समिती नियुक्त करण्यात आली होती, भरती प्रक्रिया करण्यासाठी डाॅ.माने महेशकुमार यांना हाॅस्पिटल मॅनेजरची जवाबदारी देण्यात आली होती, परंतु या समितीने आयुक्त, मुंबई यांच्या दि.२१/०५/२०२० च्या निर्देशीत केलेल्या सूचनानुसार भरती प्रक्रीयेत काटेकोरपणे पालन न करता अतिरिक्त पदे भरणा केली. तत्कालीन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी वेळोवेळी निर्देशित केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन न करता जिल्हारूग्णालय डीसीएच बीड येथे ६३ , नर्सिंग हाॅस्टेल येथे ५३ ,व डीसीएच आयटीआय येथे ०५ असे एकुण १२१ कर्मचा-यांची अतिरिक्त भरती करण्यात आली.मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी वेळोवेळी रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर मनुष्यबळ कमी करणे आदेशित असताना देखील कमी केले नाहीत, तसेच दि.०४ /०६/२०२१ आणि दि.११ /०६/२०२१ नुसार बंद करण्यात आलेल्या संस्थामधील कंत्राटी कर्मचारी एकुण २१६ यांना देखील कामावरून कमी केले नाही, त्यामुळेच सदरील कंत्राटी कर्मचारी यांचे मानधन देण्यासाठी अडचणी उदभवल्या, सदरील कर्मचारी हे जिल्हारूग्णालय परिसरात उपोषण, निदर्शने करत आहेत, वाढीव मनुष्यबळापेक्षाही आधिकचे मनुष्यबळ नियुक्त करून गंभीर अशी प्रशासकीय अनियमितता या समितीने केली आहे.
मुख्य कार्यकारी आधिकारी अजित कुंभार यांचे आदेश डावलले; निलंबनाची शिफारस
जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अथवा जिल्हाशल्यचिकित्सक बीड यांची कोणतीही परवानगी न घेता अशा नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, सीसीसी या संस्था बंद पडल्यानंतर कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा खंडीत करणे अपेक्षित असताना असे केले गेले नाही व प्रशासनाला अंधारात ठेवल्यामुळे वेतनचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित कुंभार यांनी टीपन्नीमध्ये स्पष्टपणे डाॅ.राठोड, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक यांनी या वाढीव मनुष्यबळापेक्षाही अधिकचे मनुष्यबळ नियुक्त करून गंभीर अशी प्रशासकीय अनियमिता केली आहे यास्तव रूपये ४४,३९९२ /- अतिरिक्त खर्च केलेले आहे, ही बाब अतिशय गंभीर असून शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र आहे.सर्व बाबींचा विचार करता डाॅ.सुखदेव राठोड, डाॅ.महेश माने, डाॅ.ढाकणे हे तिघेही दोषी असल्याचे मत व्यक्त केलेले आहे तर जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांनी चौकशी करून आयुक्त यांना अहवाल सादर करत निवड समितीतील तिन्ही दोषींवर निलंबनाची कार्यवाही करणेबाबत कळवले आहे.
तरी कोविड कालावधीत सर्वसामान्य जनता त्रस्त असताना बीड जिल्हा रूग्णालयातील वरील निवड समितीने अनाधिकृत पद भरती करून मोठ्याप्रमाणात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार केला असून संबधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.