श्रीलंकेत मोठ आर्थिक संकट इंधन घेण्यासाठी रांगेत उभ्या दोघांचा मृत्यू,कागद खरेदी करण्यासाठी देशाकडे डॉलर नाहीत
श्रीलंकेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशावरील कर्ज सातत्याने वाढत असून, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सध्या दिसत नाही. ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे श्रीलंकेत महागाईने उच्चांक गाठला असून त्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत आहे.
देशात कागद खरेदी करण्यासाठी डॉलर नाही. पेपर खरेदी करता न आल्याने देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाहेरून कागद खरेदी करण्यासाठी देशाकडे डॉलर नाहीत. दरम्यान, श्रीलंकन सरकारने जाहीर केले की ते IMF कडून आपल्या बिघडलेल्या विदेशी कर्जाच्या संकटाचे निराकरण करण्यासाठी आणि परकीय चलन साठा वाढवण्यासाठी बेल-आउट पॅकेज मागणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या विनंतीवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
श्रीलंकेतील लोक वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर दोन जणांचा मृत्यू झाला आहे, दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे हैराण झालेले लोक इंधन खरेदी करून त्याचा साठा करत आहेत. दरम्यान, रविवारी श्रीलंकेतील दोन वेगवेगळ्या भागात इंधन घेण्यासाठी रांगेत तासनतास प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले दोन्ही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असून त्यांचं वय ७० वर्षांपेक्षा अधिक होतं, असं कोलंबोतील पोलिस प्रवक्ते नलिन थलदुवा यांनी सांगितलं. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोल आणि रॉकेल घेण्यासाठी रांगेत उभे होते. यादरम्यान ते बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.
श्रीलंकेत अनेक तास वीज खंडित होत आहे. त्यामुळे लोक पंपांवर तासनतास रांगा लावून इंधन घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या पहिल्या व्यक्तीचं वय 70 वर्ष होतं आणि तो दुचाकी चालक होता, जो मधुमेह आणि हृदय विकाराचा रुग्ण होता. तर दुसरा व्यक्ती 72 वर्षांचा होता. दोघेही जवळपास ४ तास इंधनासाठी रांगेत उभे होते. ”देशातील कच्च्या तेलाचा साठा रविवारी संपल्यानंतर एकमेव इंधन रिफायनरी देखील बंद करण्यात आली आहे”, असं पेट्रोलियम जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अशोक रानवाला म्हणाले.