बीड दहावीचा इंग्रजीचा पेपर झेरॉक्सच्या दुकानात 20 रुपयात ,झेरॉक्स मशिन सह चालक ताब्यात
दहावीच्या इंग्रजीच्या पेपरची अवघ्या 20 रुपयांत झेरॉक्सच्या दुकानातून विक्री होत असल्याचे समोर आले आहे यातूनच कॉपी आणि पेपरफुटीचे प्रकार रोखण्यात राज्य शिक्षण मंडळालाही अपयश आल्याचे स्पष्ट झाले.
बीड : बारावीचा रसायनशास्त्र आणि गणिताचा पेपर थेट विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर पोहोचल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता दहावीच्या इंग्रजीच्या पेपरची अवघ्या 20 रुपयांत झेरॉक्सच्या दुकानातून विक्री होत असल्याचे समोर आले आहे. यातूनच कॉपी आणि पेपरफुटीचे प्रकार रोखण्यात राज्य शिक्षण मंडळालाही अपयश आल्याचे स्पष्ट झाले. दहावीच्या इंग्रजीच्या पेपरची बीडमधील साक्षाळप्रिंपी गावात पेपरफूट झाल्याची बाब समोर आली आहे. सहायक पोलिस अधीक्षका पंकज कुमावत यांच्या पथकाने केलेल्या छापेमारीत इंग्रजीचा पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस
आला
15 मार्चपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून 19 रोजी इंग्रजीचा पेपर होता. यादरम्यान बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील केंद्रावर परीक्षा सुरू असताना, संजय मुरलीधर पालवे यांच्या झेरॉक्स सेंटरमधून उत्तरांच्या प्रती विक्री केल्या जात होत्या. यादरम्यान कुमावत यांच्या पथकाने झेरॉक्स सेंटरवर छापा टाकला. यावेळी प्रश्न क्र. 3 व 4 च्या झेरॉक्स प्रती 20 रुपयांना एक याप्रमाणे विक्री केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
यादरम्यान पोलिसांनी झेरॉक्स चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे मिळून आलेल्या 2 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येकी 80 प्रती आणि झेरॉक्स मशिनही पोलिसांनी जप्त केले आहे.