बीड : बीड जिल्ह्यातील विडा या गावात जावयाला रंगपंचमीच्या दिवशी चक्क गाढवावर बसून, त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. विडाकरांची ही अनोखी परंपरा गेल्या 81 वर्षांपासून सुरु आहे. ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरु केल्याचे त्यांचे वंशज सांगतात.
होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा रंगांचा सण आणि वसंत ऋतूचा सण म्हणून ओळखला जातो. होळी हा सण भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या शाश्वत प्रेमाला श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो.होळी हे वसंत ऋतु कापणीच्या हंगामाचे आगमन आणि देशात हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक आहे. होळी व रंगपंचमी ही फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा १७ मार्चला होळी तर १८ मार्चला रंगपंचमी हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
नवीन जावयाला गाढवावर बसवून त्यांची संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. तसेच या जावयाला त्याच्या आवडीचे कपडे देखील दिले जातात. दरम्यान हा संपूर्ण प्रकार बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा यवता या गावात होळी या सणानिमित्त केला जातो. गावातील नवीन जावई ओळखायला तीन ते चार दिवस लागतात. होळीच्या दिवशी बहुतेक वेळा गावातील जावई या परंपरेपासून पळ काढण्यासाठी कुठेतरी लपून देखील बसतात परंतु गावकऱ्यांची या जावयांवर संपूर्ण नजर असते, जेणेकरून ही परंपरा प्रत्येक वर्षी जपली गेली पाहिजे. या परंपरेमध्ये कोणताही खंड पडू नये म्हणून गावकरी नेहमी काळजी घेत असतात
नवविवाहित जावयाला गाढवावर बसवून काढतात मिरवणूक
केज तालुक्यातील विडा यवता गावामध्ये आनंदराव देशमुख परिवारातील दोन जावयांनी होळीच्या दिवशी रंग लावण्यास मनाई केली होती. दरम्यान सासरच्या मंडळींनी फुलांनी सजलेला एक गाढव मागवला आणि त्या गाढवावर दोन्ही जावयांना बसवले. या दोन्ही जावयाची पूर्ण गावामधून मिरवणूक देखील काढली.सुरुवातीला जावयांना गाढवावर बसून मंदिरापर्यंत घेऊन जाण्यात आले. तिथे गेल्यावर जावयांची आरती करण्यात आली. त्यांना नवीन कपडे आणि सोन्याची वस्तु दिली गेली. तिथे गेल्यावर त्यांचे तोंड गोड करण्यात आले आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर रंग लावण्यात आला. ही परंपरा जरी विचित्र असली तरी गावांमध्ये तितक्याच जल्लोषाने आणि आनंदात साजरी केली जाते. त्या दिवसापासून ते आजतगायत या गावांमध्ये असेच घडत आलेले आहे म्हणूनच ही परंपरा आज ही तशीच जपली जात आहे.