ताज्या बातम्यामुंबई

भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर ‘ये तो अभी झांकी है महाराष्ट्र बाकी है’ अशा घोषणांनी सेलिब्रेशन


विधानभवनात फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भाजपानं जोरदार सेलिब्रेशन केलं. यावेळी ‘ये तो अभी झांकी है महाराष्ट्र बाकी है’, अशा घोषणा भाजपा नेते देत असताना दिसले.

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबईत पक्षाच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं.मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं आहे. आता खरी लढाई मुंबईत असणार आहे. आम्ही मैदानात उतरलो आहोत आणि उद्यापासूनच तयारी लागा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

“चार राज्यांमध्ये मतदारांनी मोदीजींवर विश्वास दाखवला आणि घवघवीत यश भाजपाला मिळालं आहे. पण याचा सगळ्यांनाच आनंद झालेला दिसत नाही. काहींना इतकी मळमळ झाली तरी मी पुन्हा एकदा सांगतो मोदीजीच निवडून येणार आहेत. आमचे कार्यकर्ते यूपी, गोव्यात प्रचाराला गेले होते. गोव्यातील विजयात महाराष्ट्राचाही वाटा आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. उत्तर प्रदेशात बुलडोझर बाबानं कमाल केली. मोदींच्या मागे जनतेचा आशीर्वाद आहे. लढाई संपली नाही. कुठल्याच लढाईनं होरपळून जायचं नाही. खरी लढाई मुंबईत होणार आहे. आम्हाला मुंबईला कोणत्या एका पक्षाकडून नव्हे, तर भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. आजचा विजयाचं सेलिब्रेशन झाल्यानंतर उद्यापासून कामाला लागा. मुंबईचा प्रचंड विजय आणि राज्यात भाजपाचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज राहावं”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे.

भाजपाच्या प्रदेश कार्यालयात जल्लोषात फडणवीसांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीष महाजन यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते. प्रदेश कार्यालयात फडणवीसांचं स्वागत झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *