अकोलाताज्या बातम्या

कापसाचे दर प्रतिक्विंटल १० हजार ७०० ते १० हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचला


अकोला : गेल्या काही दिवसांपासून पांढरे सोने चकाकत असून, दरदिवशी कापसाचे दर वाढतच चालला आहे. जिल्ह्यातील कापसासाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ अकोट येथे कापसाचे दर प्रतिक्विंटल १० हजार ७०० ते १० हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
अकोट बाजार समितीत गुरुवारी कापसाला उच्चांकी दर मिळाला असून, कापूस १० हजार ७०५ रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला आहे.

मागील पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळीने चांगलाच तडाखा दिल्याने वेचणीला आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले. सध्या कापूस वेचणीचे काम वेगाने सुरू असून, मजूर मिळत नसल्याने अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस आहे. अकोट बाजार समितीत कापसाला विक्रमी दर मिळत असल्याने वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा ओढा अकोटकडे वाढला आहे.

यंदा कापसाचे वेचणीचे दर प्रतिकिलो १० रुपयांवर पोहोचले आहेत. त्याशिवाय मजुरांचा वाहतुकीचा खर्च गृहीत धरला तर प्रतिकिलोला १२ ते १३ रुपये खर्च येतो. दरवर्षीपेक्षा यंदा महागाईमुळे लागवड खर्च दुपटीने वाढला आहे. त्यामुळे बाजारात कापसाला मिळत असलेल्या चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दिवसेंदिवस बाजार समितीत कापसाची आवक वाढत असल्याचे चित्रही दिसून येत आहे.

वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा कल अकोटकडे

अकोट बाजार समितीत कापसाला विक्रमी दर मिळत असल्याने वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा कल अकोटकडे वळला आहे. अकोटच्या बाजार समितीत वाशिम, खामगाव, बुलडाणा, अमरावती, दर्यापूर येथील कापूस विक्रीसाठी येत आहे. यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत सोयाबीनपाठोपाठ कापसालाही मोठा फटका बसला आहे. कापसाचा लागवड खर्च दरवर्षी वाढत असल्याने शेतकऱ्यांनी पेरा कमी केला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा पांढऱ्या सोन्याला झळाळी आली आहे. अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने या भावात भविष्यात मोठी वाढ होणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *