कोल्हापूर : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणींनी दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. अर्जुनवाडा (ता. कागल) आणि कांडवण (ता. शाहूवाडी) येथे हे प्रकार घडले आहेत.
सेनापती कापशी : अर्जुनवाडा येथील युवतीचा विष प्याल्याने आज सकाळी मृत्यू झाला. आकांक्षा भीमराव सातवेकर (वय १९) असे तिचे नाव आहे. तिच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. विवाहित असूनही लग्नासाठी त्रास देणारा संशयित अमित भीमराव कुंभार (२५, रा. अर्जुनवाडा) याला मुरगूड पोलिसांनी अटक केली. याबाबत तरुणीचे वडील तानाजी सातवेकर यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः आकांक्षा देवचंद महाविद्यालयात कला शाखेत शिकत होती. संशयित अमित डी.एड. असून, तो एका शाळेत सरावासाठी जातो. तो विवाहित असूनही तिच्याकडे लग्न करण्याची सतत मागणी करीत होता. लज्जा उत्पन्न होईल, असे तिला संदेश पाठवत होता. त्याला कंटाळून आकांक्षाने गेल्या शनिवारी (ता. २२) विष प्यायले होते. उपचार सुरू असताना आकांक्षाने काल (ता. २७) आपल्या वडिलांना अमित कुंभार त्रास देत होता, असे डॉक्टरांसमोर कागदावर लिहून दिले. त्यानंतर संशयित कुंभारवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
कांडवणमधील तरुणास कोठडी
शाहूवाडी : कांडवण येथील २१ वर्षीय तरुणीने गावातीलच प्रेमवीराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी (ता. २५) घडला. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित अमोल संजय सुतार (रा. कांडवण) याला अटक केली. त्याला उद्या (ता. २९)पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः दोघेही एकाच गावातील आहेत. संबंधित तरुणी आणि अमोल सुतार यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे तरुणीच्या कुटुंबीयांना समजले. त्यानंतर तरुणीने प्रेमसंबंध संपुष्टात आणले होते. मात्र, अमोलने प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी तगादा लावला होता. तो तरुणीच्या मोबाईलवर संदेश पाठवून व संपर्क साधून, ‘तू माझ्याशी लग्न कर नाही तर मी जीव देईन’ असे वारंवार धमकावत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घरात गळफास लावून मंगळवारी आत्महत्या केली. सहायक पोलिस निरीक्षक शैलजा पाटील तपास करीत आहेत.