-
राष्ट्रीय बालपुरस्कारार्थी स्वयंम पाटील यांचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिनंदन
-
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भुजबळ फार्म येथील कार्यालयात स्वयंम पाटीलची भेट घेत केले कौतुक
-
नाशिकच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्या खेळाडूंना सर्वोत्तोपरी मदत करणार -भुजबळ
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा प्रकारातील स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीबद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ देवून स्वयंम पाटील यांस गौरविण्यात आले आहे. ही बाब नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी असल्याचे सांगत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज स्वयंम पाटील व त्याच्या कुटुंबियांची भुजबळ फार्म येथील कार्यालयात भेट घेत अभिनंदन केले आहे.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी स्वयंम पाटील याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत स्वयंम पाटीलसारखे खेळाडू म्हणजे नाशिकचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले. स्वयंम पाटील या १४ वर्षीय बालकाने एलिफंट गुफा ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किलोमीटर खाडी ४ तास ९ मिनीटांत पोहून पार केल्याचा विक्रम स्वयंम पाटीलने केला आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने त्यास क्रीडा क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ देवून सन्मानीत केले.
या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी संजीवनी जाधव, क्रीडा अधिकाई महेश पाटील , प्रकाश पवार, अविनाश टिळे व संदीप ढाकणे, माजी आमदार जयवंत जाधव उपस्थित होते.