अंघोळ करताना अल्पवयीन मुलीचे फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला अटक
औरंगाबाद : अंघोळ करताना अल्पवयीन मुलीचे फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला फुलंब्री पोलिसांनी शनिवारी (ता. २२) रात्री अटक केली. अविनाश कमळाजी हरणे (वय २२, जिऔरंगाबाद) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आर. कुरेशी यांनी रविवारी (ता. २३) दिले.
प्रकरणात १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता ही मावशीकडे राहते. २२ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पीडिता अंघोळ करताना आरोपीने बाथरुमच्या खिडकीतून फोटो अथवा शुटींग केल्याचे उघड झाले. पीडितेच्या मावशीने आरोपीला रंगेहाथ पकडले व आरोपीचा मोबाईल हिसकावून घेतला, त्यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.